बिहार : काँग्रेसचे आमदार फुटतील; तेजस्वी यादवला भीती

Tejashwi Yadav

पटणा : विधानसभेच्या निवडणुकीत भाजपाला जदयुपेक्षा जास्त जागा मिळाल्याने भाजपाचा मुख्यमंत्री व्हावा, अशी मागणी भाजपाच्या काही नेत्यांनी केली आहे. त्यामुळे एनडीएमध्ये (NDA) गोंधळ होईल आणि महाआघाडीला सरकार स्थापन करण्याची संधी मिळेल, अशी आशा राजदचे तेजस्वी यादव यांना आहे. ते संधी शोधत आहेत. मात्र, काँग्रेसचे आमदार फुटू शकतात आणि आपली संधी हुकेल, अशी भीती त्यांना वाटते आहे. तेजस्वी हे काँग्रेसच्या आमदारांवर लक्ष ठेवून आहेत. भाजपाला ७४ आणि जदयुला ४३ जागा मिळाल्या आहेत. एनडीएला काठावरचे बहुमत (१२५ जागा) आहे.

त्यामुळे ही स्थिती निर्माण झाली आहे. गुरुवारी पाटणा येथे माजी मुख्यमंत्री राबडीदेवी यांच्या निवासस्थानी महाआघाडीच्या नेत्यांची बैठक झाली. राजदचे नेते तेजस्वी यादव (Tejaswi Yadav) यांनी आमदारांना संबोधित करताना बिहारमध्ये महाआघाडीचे सरकार बनेल असा दावा केल्याने राजकीय चर्चेला उधाण आलं आहे.

एनडीएच्या मंत्रिमंडळात जीतनराम मांझी, मुकेश सहनी यांच्या पक्षाला किती टक्के वाटा मिळणार याकडे महाआघाडीचे लक्ष आहे. त्यात एनडीएत काही बिनसलं तर महाआघाडी त्याचा फायदा घेऊन सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न करणार आहे. बिहारमध्ये महाआघाडीला ११० जागा मिळाल्या आहेत.

राजदने ७५ जागा जिंकल्या आहेत. डाव्यांना १६ जागा मिळाल्या असून महाआघाडीतील काँग्रेसच्या कामगिरीवर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. काँग्रेस नेते तारिक अन्वर यांनीही काँग्रेसमुळे महाआघाडीचा विजय झाला नाही हे सत्य पक्षाने स्वीकारले पाहिजे, असे म्हटले आहे. काँग्रेसचा ‘स्ट्राइक रेट’ खूप कमी आहे. या जागा डावे आणि राजदाला  मिळाल्या असत्या तर निकाल वेगळा लागला असता अशीही चर्चा बैठकीत झाली. काँग्रेसने ७० जागा लढवल्या व अवघ्या १९ जिंकल्या आहेत. आता काँग्रेसचे आमदार फुटण्याची भीती व्यक्त करण्यात येते आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER