बिहारमध्ये बोट नदीत उलटली, पाच जणांचा मृत्यू तर अनेक जण बेपत्ता

Bhagalpur - Boat capsized

पाटणा : बिहारमध्ये (Bihar) भागलपूर परिसरात गंगेच्या उपनदीत प्रवाशांनी भरलेली बोट उलटल्याची दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण बेपत्ता आहेत. या बोटीत १०० पेक्षा अधिक जण होते. घटनास्थळी सध्या एसडीआरएफची (SDRF) पथकं दाखल झाली आहेत.

गंगेच्या उपनदीत बोट उलटताच एकच खळबळ माजली. गोपालपूर पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या तीनटंगा दियारा जहाज घाटावर काही मजूर आणि शेतकरी हे एका खासगी बोटीने शेतावर काम करण्यासाठी चालले होते. परंतु, बोटीत मर्यादेपेक्षा जास्त लोकं असल्यामुळे या बोट दुर्घटनाग्रस्त झाली, अशी माहिती समोर आली आहे. आतापर्यंत जवळपास २५ प्रवाशांना नदीतून सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं आहे. तर १५ जणांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बोट उलटल्यानंतर बेपत्ता झालेल्या प्रवाशांचा सध्या शोध सुरू आहे.

दुर्घटनास्थळी एसडीआरएफच्या पथकांसह स्थानिक प्रशासनाकडून बचावकार्य सुरू आहे. अद्याप अनेक जण बेपत्ता असून त्यांचा शोध घेतला जात आहे. नदीत उलटलेल्या बोटीत महिलांची संख्यादेखील जास्त होती. अनेक जण बेपत्ता असल्यानं मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER