
2020 मध्ये कोरोनामुळे संपूर्ण जगभरातील सिनेमा इंडस्ट्री बंद होती. त्यामुळे अनेक मोठे सिनेमे तयार होऊ शकले नाहीत आणि प्रदर्शितही होऊ शकले नाहीत. मात्र यावर्षी हे सर्व मोठे सिनेमे प्रदर्शित होणार असून प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे. यात हॉलिवुडमधील नो टाईम टू डाय, फास्ट अँड फ्यूरियस 8, टॉप गन मेव्हरिक, ब्लॅक विडो, व्हेनम- लेट देअर बी कार्नेज या सिनेमांचा जसा समावेश आहे तसाच बॉलिवुडमधील सलमान खान (Salman Khan) , आमिर खान (Aamir Khan), शाहरुख खान (Shah Rukh Khan), अक्षय कुमार( Akshay Kumar) , रणबीर कपूर, रणवीर सिंह, अजय देवगण या कलाकारांचेही मोठे सिनेमे आहेत. या सगळ्या कलाकारांचे मिळून 25 पेक्षा जास्त मोठे सिनेमे रिलीज होणार आहेत. अर्थात यात हॉलिवुडच्या सिनेमांचा समावेश नाही. त्यांचा समावेश केला तर प्रत्येक महिन्याला साधारणतः तीन मोठे सिनेमे रिलीज होण्याची शक्यता आहे.
तर चला पाहूया कोणते ते मोठे चित्रपट आहेत जे प्रेक्षकांनी मेजवानी देण्यास या वर्षात पडद्यावर येणार आहेत.
बॉलिवुडमध्ये 100 टक्के हिट सिनेमा देणारा दिग्दर्शक म्हणून रोहित शेट्टीची ओळख झाली आहे. या वर्षी त्याचे एक, दोन नव्हे तर तीन सिनेमे रिलीज होणार आहेत. यात सगळ्यात महत्वाचा सिनेमा आहे सूर्यवंशी. या सिनेमातून तो अक्षयकुमारला प्रथमच इन्स्पेक्टरच्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर आणत आहे. यात ‘सिंघम’ अजय देवगण आणि ‘सिंबा’ रणवीर सिंह यांचीही भूमिका आहे. या सिनेमाकडे संपूर्ण बॉलिवुडचे लक्ष लागलेले आहे.
भारताने 1983 मध्ये वर्ल्ड कप जिंकून इतिहास रचला होता. त्यावर आधारित 83 नावाने एक सिनेमा तयार असून तोसुद्धा यावर्षी रिलीज होणार आहे. यात भारतीय क्रिकेट टीमचा कप्तान कपिल देवची भूमिका रणवीर सिंहने साकारली आहे. अन्य क्रिकेटर्सच्या भूमिका पंकज त्रिपाठी, साहिल खट्टर, चिराग पाटील, आदिनाथ कोठारे इत्यादी कलाकारांनी साकारली आहे. कपिल देवच्या पत्नीच्या रोमीची भूमिका दीपिका पदुकोण साकारत आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे यशस्वी दिग्दर्शक कबीर खानने. याची निर्मिती रिलायंस एंटरटेनमेंट, फँटम फिल्म्स, के.ए प्रोडक्शंस, विब्री मीडिया, कबीर खान फिल्म्स आणि नाडियाडवाला ग्रँडसन एंटरटेनमेंट या सहा कंपन्यांनी एकत्र येऊन केली आहे.
सलमान खानने लॉकडाऊन उठल्यानंतर सर्वप्रथम त्याच्या बहुचर्चित ‘राधे- द मोस्ट वाँटेड भाई’ चे शूटिंग पूर्ण केले. या सिनेमात सलमानसोबत दिशा पटानी, रणदीप हुडा आणि जॅकी श्रॉफ यांच्या मुख्य भूमिका असून दिग्दर्शन केले आहे प्रभुदेवाने. स्वतः सलमान खानने त्याच्या सलमान खान फिल्म्स आणि रील लाईन एंटरटेनमेंटने एकत्र येत या सिनेमाची निर्मिती केली आहे. झी स्टुडियो जगभरात हा सिनेमा रिलीज करणार आहे.
दोन-तीन वर्षांपूर्वी आलेल्या साऊथच्या नायकाचा यशचा के.जी.एफ. सिनेमा बॉक्स ऑफिसवर सुपरहिट झाला होता. त्याचाच पुढचा भाग के.जी.एफ 2 नावाने यावर्षी प्रदर्शित होणार आहे. यात यशच्या समोर संजय दत्त खलनायक म्हणून उभा असून नायिका आहे श्रीनिधी शेट्टी. याचे दिग्दर्शन प्रशांत नीलने केले असून एक्सेल एंटरटेनमेंट आणि हॉम्बेल स्टूडियो यांनी याची निर्मिती केली आहे.
बाहुबली सिनेमाने संपूर्ण भारतात लोकप्रिय झालेला प्रभास एका लव्हर बॉयच्या रुपात यावर्षी पडद्यावर येणार आहे. राधेश्याम असे या सिनेमाचे नाव असून यात त्याची नायिका आहे पूजा हेगडे. लैला मजनू, शिरीन फरहाद या प्रेमी जोड्यांप्रमाणे या सिनेमात या दोघांची जोडी दाखवण्यात आलेली आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन राधा कृष्ण कुमार असून यूव्ही क्रिएशन्स आणि टी सीरीजने याची निर्मिती केली आहे.
ठग्स ऑफ हिंदुस्तानच्या अपयशानंतर आमिर खान हॉलिवुडच्या फॉरेस्ट गम्पवर आधारित लाल सिंह चड्डा यावर्षी प्रदर्शित होणार आहे. यात आमिरसोबत करीना कपूर दिसणार आहे. यात आमिर एका वेगळ्या रुपात दिसणार आहे. अद्वैत चंदन दिग्दर्शित या सिनेमाची निर्मिती आमिर खान प्रोडक्शन आणि व्हायकॉम 18 मोशन पिक्चर्स मिळून करीत आहे.
आर.आर.आर. हा सध्याच्या काळातील सगळ्यात महागडा आणि मल्टीस्टारर सिनेमा आहे. यात ज्युनियर एनटीआर, राम चरण, आलिया भट्ट आणि अजय देवगन यांच्या मुख्य भूमिका असून प्रख्यात दिग्दर्शक एसएस राजामौलीने याचे दिग्दर्शन केले आहे.
हा सिनेमा चार भाषांमध्ये प्रदर्शित केला जाणार असून याची निर्मिती डीवीवी एंटरटेनमेंट्सने केली आहे.
अक्षयकुमारचा साऊथच्या सिनेमाची रिमेक असलेला बच्चन पांडे ही यावर्षी रिलीज होणार आहे. यात अक्षय कुमारसोबत और कृति सेनन दिसणार आहे. याचे दिग्दर्शन फरहाद सामजीने केले असून नाडियाडवाला ग्रँडसन एंटरटेनमेंटने याची निर्मिती केली आहे. यासोबतच अक्षयकुमारचा बेल बॉटमही यावर्षी प्रदर्शित होणार आहे. हा एक स्पाय थ्रिलर असून याचे दिग्दर्शन रंजीत तिवारीने केले असून निर्मिती पूजा एंटरटेनमेंटने केली आहे.
सलमान खानने त्याच्या बहिणीच्या नवऱ्यासाठी आयुषसाठी तयार केलेला अंतिम सिनेमाही यावर्षी रिलीज होणार आहे. मराठी सिनेमा मुळशी पॅटर्नची हा सिनेमा रिमेक आहे. महेश मांजरेकर दिग्दर्शित या सिनेमाची निर्मीी सलमान खान फिल्म्सनेच केली आहे. सलमान खानचीही यात भूमिका आहे.
सलमान खानची मुख्य भूमिका असलेला कभी ईद, कभी दीवाली हा सिनेमासुद्धा यावर्षी रिलीज होणार आहे. याचे दिग्दर्शन साजिद समजीने केले असून याची निर्मिती नाडियाडवाला ग्रँडसन एंटरटेनमेंट आणि सलमान खान फिल्म्सने केली आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला