बिग फाईट : शत्रुघ्न सिन्हा पडू शकतात

Badgeलोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात बिहारमधील पाटणासाहिब मतदारसंघात कोण ‘खामोश’ होणार याकडे देशाचे लक्ष लागले आहे. तावातावात भाजपला रामराम ठोकून शत्रुघ्न सिन्हा यांनी काँग्रेसची उमेदवारी घेतली खरी; पण भाजपच्या ह्या पारंपरिक मतदारसंघात केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांच्याशी दोन हात करताना त्यांची दमछाक सुरू आहे.

तब्बल २८ वर्षे भाजपमध्ये सत्ता भोगल्यानंतर शत्रुघ्न सिन्हा यांनी केलेली बंडखोरी भाजपला चांगलीच झोंबली आहे. दोनदा राज्यसभा आणि दोनदा लोकसभा देऊनही त्यांनी केलेली गद्दारी मोडून काढण्यासाठी भाजपचे सैन्य जिद्दीने भिडले आहेत.

ही बातमी पण वाचा : भाजपचे वाराणसीत घरोघरी संपर्क अभियान!

त्यामुळे सिन्हा यांना कठीण जात आहे. येथे तब्बल साडेसात लाख कायस्थ मतदार आहेत; पण दोन्ही उमेदवार कायस्थ असल्याने त्यांची मते वाटली जाणार आहेत. विधानसभेच्या सहा जागांपैकी पाच जागा भाजपच्या ताब्यात आहेत.  एकमेव जागा राष्ट्रीय जनता दलाकडे आहे. कायस्थ मतदार आतापर्यंत राष्ट्रीय जनता दलाच्या वाटेला गेलेला नाही. त्यामुळे स्पर्धेत येण्यासाठी सिन्हा यांची जोरदार उठापटक सुरू आहे. या मतदारसंघातून या आधी दोनदा सिन्हा विजयी झाले; पण आता भाजप पाठीशी नसल्याने त्यांची अडचण झाली आहे. ‘भाजपने आपल्याला डावलले’ हे पटवून देण्याची धडपड सिन्हा यांनी चालवली आहे.

सिन्हा यांची पत्नी पूनम सिन्हा ह्या उत्तर प्रदेशातील लखनौ येथून समाजवादी पक्षाच्या तिकिटावर उभ्या आहेत. एकेकाळी बॉलिवूड गाजवणारे हे जोडपे वेगवेगळ्या पक्षांची साथ घेऊन लढत आहेत. असे करताना त्यांची चांगलीच सर्कस होत आहे. पूनम सिन्हा यांची टक्कर देशाचे गृहमंत्री राजनाथसिंह यांच्याशी आहे. मतदानाला काही मोजके दिवस उरले असताना काही चमत्कारच शत्रूला वाचवू शकेल.

ही बातमी पण वाचा : राष्ट्रीय सुरक्षा हा मुद्दा कसा होऊ शकत नाही : पंतप्रधान मोदी