‘कोरोना’मुळे मोठी पडझड; सेन्सेस १७०० ने घसरला

Big fall in Sensex due to Corona

मुंबई : कोरोनाची लागण झालेल्यांच्या संख्येत होणारी वाढ आणि दूरसंचार कंपन्यांनी एजीआरची थकीत रक्कम भरण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या तंबीमुळे गुरुवारी बाजारात मोठी घसरण झाली. बाजार उघडताच सेन्सेक्स १७०० अंकांनी कोसळला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी) ५०० अंकांनी घसरून ७,९०० वर आला.

आजच्या पडझडीने काही क्षणात गुंतवणूकदारांचे ५ लाख कोटी बुडाले. शेअर बाजारात सर्वच क्षेत्रात विक्रीचा ओघ सुरू आहे. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समधील सर्वच ३० शेअर घसरले आहेत. आयटीसी, इन्फोसिस, सन फार्मा, बजाज ऑटो, एलअँडटी , रिलायन्स, एचयूएल, एचडीएफसी, ऍक्सिस बँक , टायटन हे शेअर घसरले आहेत. स्मॉल कॅप निर्देशांकात प्रचंड घसरण झाली. ५ वर्षांच्या नीचांकावर आला आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया ६७ पैशांनी घसरला. ७४.९० वर आहे. आशियातील प्रमुख शेअर बाजारात मोठी पडझड झाली आहे. अमेरिकेत शेअर निर्देशांक ६ टक्के घसरला.

त्याचा परिणाम आज भारतीय बाजारांवर दिसून आला. गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण कायम असून त्यांनी पैसे काढण्याचा सपाटा लावला आहे. बुधवारी मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स गेल्या तीन वर्षांत प्रथमच २९,०००च्या पातळीखाली गेला. १७०९.५८ अंकांच्या घसरणीसह हा निर्देशांक २८,८६९.५१ वर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी) ४२५.५५ अंकांनी घसरून ८,५४१.५०च्या पातळीवर स्थिरावला होता. बुधवारी सत्रांतर्गत व्यवहारात ‘सेन्सेक्स’ने ३१,१०१.७७ची उच्चांकी आणि २८,६१३.०५ची नीचांकी पातळी गाठली. तर, ‘निफ्टी’ने ९,१२७.५५ची उच्चांकी आणि ८,४०७.०५ची नीचांकी पातळी गाठली. न्यायालयाच्या निर्णयानंतर बँकिंग क्षेत्रातील समभागांमध्ये सर्वाधिक फरक पडला. या बँकांची दूरसंचार कंपन्यांवर मोठी कर्जे थकीत आहेत. आयटी क्षेत्रातील काही कंपन्यांच्या समभागांमध्ये किरकोळ तेजी दिसून आली.