राष्ट्रवादीत मोठी घडामोड : गृहमंत्रिपद अजित पवार अथवा जयंत पाटलांकडे जाण्याची शक्यता

Ajit Pawar - Jayant Patil

मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकप्रकरणी एनआयएने सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना अटक केली आहे. त्यामुळे विरोधकांच्या टीकेला सामोरं जावं लागल्यामुळे महाविकास आघाडी सरकारमध्ये मोठी उलथापालथ होण्याची चिन्हे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज दुपारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन मंत्रिमंडळात खांदेपालट करण्याचा निर्णय घेतला आहे. यात सर्वांत पहिला फटका हा गृहमंत्री अनिल देशमुख यांना बसण्याची शक्यता आहे. अनिल देशमुख यांचे पंख छाटले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

वाझेप्रकरणी ठाकरे सरकारची चांगलीच अडचण झालेली आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे गृहमंत्री बदलले जाण्याची जोरदार चर्चा आहे. अनिल देशमुख यांच्याऐवजी दुसऱ्या एखाद्या नेत्याकडे हे खातं दिलं जाण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. पण देशमुखांना बदललं जाणार की मुंबई पोलीस आयुक्त परमबीरसिंग, हे मात्र निश्चित होऊ शकलं नाही. एनआयएचा तपास हा सरकारच्या गळ्याचा फास बनत चालला आहे. त्यामुळेच वाझेप्रकरणी मुंबई पोलीस आयुक्तांवरही गाज पडू शकते अशीही चर्चा आहे. शेवटी सरकार राजकीय नेत्याचा बळी देणार की अधिकाऱ्याचा, हे महत्त्वाचं आहे. पण जोरदार चर्चा आहे हे निश्चित.

आज संध्याकाळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांची बैठक होणार आहे. या बैठकीचे कारण मंत्र्यांच्या कामगिरीचा आढावा असे सांगितले असले तरी या बैठकीत सचिन वाझेप्रकरणात डॅमेज कंट्रोल करण्याचे काम शरद पवार करू शकतात. या बैठकीत गृहमंत्री अनिल देशमुखांना हटवलं जाण्याची शक्यता आहे. गृहमंत्रिपद मोठ्या नेत्याकडे जाण्याची शक्यता वर्तवली जात असून, गृहमंत्रिपदासाठी दोन मोठ्या नेत्यांची चर्चा आहे. यात अजित पवार, जयंत पाटील यांची नावे सध्या चर्चेत आहेत. आत या बैठकीत कुठल्या नावावर शिक्कामोर्तब होईल हे आताच सांगता येणार नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER