पुणे पदवीधरमध्ये भाजपसमोर मोठे आव्हान

Sangram Deshmukh - Arun Lad
  • देशमुख-लाड-कोकाटे अशी लढत
  • शिक्षक मतदारसंघातही तिहेरी सामना

मुंबई : भाजपचा (BJP) अनेक वर्षे बालेकिल्ला राहिलेल्या पुणे पदवीधर मतदारसंघात यावेळी भाजपसमोर कडवे आव्हान उभे ठाकले आहे.त्यातच संभाजी ब्रिगेडचा पाठिंबा असलेले श्रीमंत कोकाटे (Shrimant Kokate) यांनी लढतीत चुरस आणली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यासाठी ही लढत अत्यंत प्रतिष्ठेची मानली जात आहे. त्याचवेळी राष्ट्रवादीचे (NCP) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांचीही प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

तब्बल ४ लाख २६ हजार मतदार असलेल्या या मतदारसंघात भाजपचे संग्राम देशमुख (Sangram Deshmukh )विरुद्ध राष्ट्रवादीचे अरुण लाड (Arun Lad) असा थेट सामना होत आहे. एकूण ६२ उमेदवार रिंगणात असले तरी मुख्यत्वे लढत या दोघांमध्येच रंगत आहे. संग्राम देशमुख हे सांगली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असून साखर कारखानदार आहेत. अरुण लाड हेही साखर कारखानदार आहेत. दोन साखर कारखानदारांच्या या लढतीत पराभवाचा कटू घास कोणाला खावा लागतो या बाबत उत्सुकता आहे. यावेळी संग्राम देशमुख आणि अरुण लाड यांच्यात थेट लढत दिसत असली तरी मराठा समाजात मानाचे स्थान असलेले श्रीमंत कोकाटे यांची उमेदवारीही लक्षणीय आहे. ते पहिल्यांदाच निवडणूक रिंगणात उतरले आहेत.

भाजप, रा.स्व.संघाची संपूर्ण यंत्रणा देशमुख यांच्यासाठी पूर्ण ताकदीनिशी कामाला लागली आहे. २०१४ च्या निवडणुकीत या ठिकाणी चंद्रकांत पाटील (भाजप) विजयी झाले होते. पाटील नंतर फडणवीस सरकारमध्ये क्रमांक दोनचे मंत्री झाले. २०१९ मध्ये त्यांनी पुण्यातून विधानसभेची निवडणूक लढली व ते जिंकले. तेव्हापासून रिक्त असलेल्या या जागेवर आता सार्वत्रिक निवडणूक होत आहे. मतदान १ डिसेंबरला होईल.

गेल्यावेळी चंद्रकांत पाटील आणि राष्ट्रवादीचे सारंग पाटील यांच्यात मुख्य लढत झाली तरी अपक्ष लढलेले अरुण लाड यांनीही लक्षणीय मते घेतली होती. चंद्रकांत पाटील यांना सुमारे ६५ हजार मते मिळाली. सारंग पाटील आणि लाड यांच्या मतांची बेरीज ९५ हजार इतकी होती. सारंग पाटील आणि लाड यांच्यातील मत विभाजनाचा फायदा चंद्रकांत पाटील यांना झाला व ते जिंकले. यावेळी लाड यांना राष्ट्रवादीची अधिकृत उमेदवारी देऊन सारंग पाटील यांना डावलण्यात आले. सारंग हे साताराचे खासदार श्रीनिवास पाटील यांचे पुत्र आहेत.  मनसेच्या रुपाली पाटील डोंगरे, अपक्ष नीता ढमाले यांनीही आपल्या परीने आव्हान उभे केले आहे. अरुण लाड यांच्याकडे ‘मोठ्या साहेबांचे उमेदवार’ म्हणून बघितले जाते.

पुणे शिक्षक मतदारसंघात गेल्यावेळी विजयी झालेले दत्तात्रय सावंत हे शिक्षक संघटनांच्या मदतीने उभे आहेत. भाजपचा पाठिंबा असलेले शिक्षक परिषदेचे जितेंद्र पवार, काँग्रेसचे जयंत आसगावकर आणि दत्तात्रय सावंत यांच्यात तिहेरी लढत रंगली आहे. आसगावकर यांची निवडणूक राज्यमंत्री सतेज (बंटी) पाटील आणि विश्वजित कदम या दोन काँग्रेस नेत्यांनी प्रतिष्ठेची केली आहे. सावंत यांचे समर्थक त्यांना राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा छुपा पाठिंबा असल्याचा दावा करीत आहेत. आसगावकर आणि सावंत यांच्यातील मतविभाजन हे पवार यांच्या पथ्यावर पडण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER