पवारांच्या वाढदिवशी मोठी घोषणा, सैन्यात जाणाऱ्या युवकांच्या परिवारासाठी स्त्युत्य उपक्रम

Sharad Pawar

बीड : शनिवारी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) सर्वेसर्वा खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांचा वाढदिवस बीड जिल्ह्यात विविध सामाजिक, आरोग्य उपक्रमांनी साजरा करण्यात आला. या निमित्त राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस, माजी आमदार अमरसिंह पंडित (Amarsinh Pandit) यांनी मोठी घोषणा केली.

भारतीय सैन्यदलात भरती होणाऱ्या गेवराई मतदार संघातील प्रत्येक युवकांच्या परिवारातील विद्यार्थ्यांचा पहिली ते बारावीपर्यंतच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च शारदा प्रतिष्ठानच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याची घोषणा पंडित यांनी केली. या स्तुत्य उपक्रमामुळे सामान्य कुटुंबातील तरुणांना देश रक्षणासाठी प्रोत्साहन आणि प्रेरणा या निमित्ताने मिळणार आहे. मतदार संघातील किसन दराडे, आकाश सागडे, मारोती बोरकर, महादेव राठोड, भगवान ढाकणे, योगेश मुंडे, राजकुमार नाकाडे, करण मोंढे, उमेश गोरे, संतोष गरड, विशाल डोंगरे, महेश काळे, ऋषिकेश इथापे, शहाजी थिटे, पवन महारगुडे, गणेश जोगदंड हे तरुण नुकतेच भारतीय सैन्यदलात भरती झाले आहेत. शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवारी पंडित यांच्या हस्ते या युवकांचा शाल, श्रीफळ, पुष्पहार घालून स्मृतीचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

शरद पवार यांचा वाढदिवस सर्वांनाच उर्जा देणारा असतो. त्यांच्या वाढदिवसानिमित्त देशप्रेमाची भावना अधिक वृद्धिंगत होण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे पंडित यांनी सांगितले. मतदार संघातून अधिकाधिक युवक सैन्यदलात भरती व्हावेत, अशी भावनाही त्यांनी या वेळी व्यक्त केली. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित, बाबुराव जाधव, बाळासाहेब मस्के, जगन पाटील काळे, जगन्नाथ शिंदे, तालुकाध्यक्ष भाऊसाहेब नाटकर, जिल्हा परिषद सदस्य फुलचंद बोरकर, सुनिल पाटील आदी उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER