58 स्लॅम विजेते ‘बिग थ्री’ यंदा फ्रेंच ओपनच्या एकाच गटात! सेरेनाचाही मार्ग अवघड

Nadal-Djokovic-Federer - Maharashtra Today

रविवारपासून सुरू होणाऱ्या फ्रेंच ओपन ( French Open Tennis) स्पर्धेच्या इतिहासात कधी निघाला नव्हता असा विचित्र ड्रॉ (सामन्यांचा कार्यक्रम) यंदाच्या पुरुष एकेरीचा निघाला आहे. राफेल नदाल-नोव्हाक जोकोवीच- रॉजर फेडरर (Nadal-Djokovic-Federer) हे तीन दिग्गज ‘ड्रॉ’ च्या एकाच बाजूला आहेत तर स्टेफानोस सीसीपास, डॉमिनीक थीम, अ‌ॅलेक्झांडर झ्वेरेव्ह, दानिल मेद्वेदेव, ग्रिगोर दिमित्रोव्ह ही नवी पिढी ‘ड्रॉ’ च्या दुसऱ्या बाजूला आहे. 58 वेळचे ग्रँड स्लॕम विजेते एका बाजूला आणि एकच ग्रँड स्लॅम विजेता (थीम) दुसऱ्या बाजूला असा हा ड्रॉ आहे.

फ्रेंच ओपनचा सर्वात अचंबित करणारा पण नव्या पिढीला तेवढीच संधी देणारा हा ड्रॉ असल्याची टेनीस जगतात चर्चा आहे.

यामुळे जोकोवीच- फेडरर ही लढत उपांत्यपूर्व फेरीत तर जोकोवीच किंवा फेडरर विरूध्द 13 वेळचा विजेता नदाल अशी लढत उपांत्य फेरीत होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी जोकोवीचलाच नमवत नदालने 13 व्यांदा ही स्पर्धा जिंकली होती तर याच महिन्यात इटालियन ओपनच्या विजेतेपदासाठीही नदालने जोकोला मात दिली होती.

नदालने ही स्पर्धा 13 वेळा जिंकली असली तरी त्याला जागतिक क्रमवारीनुसार तिसरे मानांकन देण्यात आले आहे. क्रमवारीनुसार सर्वोच्च स्थानावरील जोकोवीच हा अग्रमानांकित आहे तर दानिल मेद्वेदेवला दुसरे मानांकन मिळाले आहे.दानिल मेद्वेदेवला दुसरे मानांकन मिळालेले असले तरी त्याने या स्पर्धेत अद्याप मेन ड्रॉचा एकसुध्दा सामना जिंकलेला नाही आणि क्ले कोर्टवर खेळणे त्याला फारसे आवडत नाही हे त्याने लपवून ठेवलेले नाही.

रॉजर फेडररला आठवे मानांकन असून तो एक वर्षाच्या खंडानंतर या स्पर्धेत खेळणार आहे. गेल्यावर्षी तो दुखापतीमुळे या स्पर्धेत खेळला नव्हता.

राॕजर फेडररने स्वतःच काही दिवसांपूर्वी म्हटलेय की, फ्रेंच ओपनचे जेतेपद आता पुन्हा त्याच्या नावावर लागणे कठीणच आहे पण राफेल नदालने मात्र म्हटलेय की, कुणीच अपराजेय नाही. तो स्वतःसुध्दा यंदा माँटे कार्लो आणि माद्रिदला तो पराभूत झाला होता त्यामुळे प्रत्येकाला संधी आहे असे नदालने म्हटले आहे.

दानिल मेद्वेदेवची रोलँड गॕरोवर कामगिरी फारशी चांगली नसल्याने त्याच्या बाजूच्या ड्रॉमधून जोकोवीच किंवा नदाल हेच विजेतेपदाच्या लढतीपर्यंत पोहोचतील असा अंदाज आहे आणि दुसऱ्या बाजूने येणाऱ्या सीसीपास, झ्वेरेव्ह किंवा थीमशी त्यांची जेतेपदाची लढत होण्याची शक्यता आहे.

महिलांमध्ये नंबर वन आणि अग्रमानांकित अॕशली बार्टी ही बर्नार्डा पेरा हिच्याविरुध्दच्या सामन्याने आपल्या मोहिमेला सुरूवात करेल.नाओमी ओसाकाला दुसरे मानांकन असून तिचा पहिला सामना रुमानियाच्या पॕट्रिशिया मारिया हिच्याशी आहे. ओसाकाने सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदा करण्यास नकार दिला आहे. गेल्या वर्षीची विजेती इगा स्वायटेक हिला आपली मैत्रिण स्लोव्हेनियाची काया युवान हिच्याशी खेळून सुरूवात करायची आहे. गवर्षीची उपविजेती सोफिया केनिन हिचा पहिला सामना 2017ची विजेती येलेना ओस्टापेंको हिच्याशी आहे. 24 व्या ग्रँड स्लॕम विजेतेपदाच्या प्रतिक्षेत असलेल्या सेरेना विल्यम्सचा सामना आयरिना कॕमेलिया हिच्याशी आहे.

अॕशली बार्टी हिच्या मार्गात जेनिफर ब्रॕडी व कोको गॉफ अशा तगड्या प्रतिस्पर्धी आहेत. ड्रॉच्या ह्याच बाजूला एलिना स्वितोलीना, कॕरोलिना प्लिस्कोव्हा दोना व्हेकिच आणि व्हिनस विल्यम्स आहेत. कॕन्सरवर मात करुन पुन्हा मैदानावर परतलेली कार्ला सुआरेझ नवारो हिचा सलामी सामना अमेरिकेच्याच स्लोन स्टिफन्सशी आहे.

ड्रॉच्या दुसऱ्या बाजूला सोफिया केनिन विरुध्द इगा स्वायटेक हा गेल्यावर्षीचा अंतिम सामना यंदा उपांत्यपूर्व फेरीतच होऊ शकतो. याच बाजूला 2016 ची विजेती गर्बाईन मुगुरूझासुध्दा आहे. सेरेना विल्यम्सला तिसऱ्या फेरीत माजी नंबर वन अँजेलिक कर्बर आणि चौथ्याफेरीत पेत्रा क्वितोव्हाचा सामना करावा लागू शकतो. यात यशस्वी झाल्यास तिला तिसरी मानांकित एरिना साबालेंका किंवा व्हिक्टोरिया अझारेंकाचा सामना करावा लागू शकतो.हे पाहता सेरेना विल्यम्सचा 24 व्या स्लॕम विजेतेपदाचा मार्ग कठीणच आहे हे दिसुन येते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button