अयोध्येत प्रजासत्ताकदिनी मशिदीचे होणार भूमिपूजन

Mosque Hospital To Be Built In Ayodhya

लखनौ : अयोध्येत एकीकडे भव्य राम मंदिराच्या निर्माणाला सुरुवात झाली असतानाच ५ एकर जागेवर मशीद उभारणीलाही गती आली आहे. इंडो इस्लामिक कल्चरल फाऊंडेशनने (Indo-Islamic Cultural Foundation ) (आयआयसीएफ) येथे उभारण्यात येणाऱ्या मशिदीचा आराखडा नुकताच प्रसिद्ध केला आहे. २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताकदिनी मशिदीच्या वास्तूचे भूमिपूजन केले जाणार असल्याची माहिती आहे.

नवीन मशीद पूर्वीच्या बाबरी मशिदीपेक्षाही मोठी असणार आहे. फैजाबाद पंचायत डिस्ट्रिक्ट बोर्डाच्या परवानगीनंतर मशिदीच्या बांधकामास प्रारंभ होणार आहे. या मशिदीचे नाव कुठल्याही सम्राट किंवा राजाच्या नावाने नसेल तर धन्नीपूर मशीद अशीच तिची ओळख असेल, असे आयआयसीएफने म्हटले आहे. १५ ऑगस्टपासून मशिदीच्या बांधकामास सुरवात होऊ शकते.

सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) २०१९ मध्ये नोव्हेंबर महिन्यात राम मंदिर आणि बाबरी मशीदप्रकरणी निकाल दिला होता. मशिदीच्या निर्मितीसाठी सुन्नी वक्फ बोर्डाला अयोध्येतच ५ एकर जागा देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. त्यानंतर उत्तर प्रदेश सरकारने अयोध्येच्या सोहावालमध्ये धन्नीपूर गावात पाच एकर जमीन मशिदीसाठी दिल या जमिनीचे हस्तांतरही झाले आहे. या संपूर्ण प्रकल्पाचा नेमका खर्च किती होईल याची माहिती अद्याप देण्यात आलेली नाही. सुसज्ज रुग्णालय आणि ग्रंथालय यामशिदीशेजारीच २०० खाटांचे एक भव्य सुसज्ज रुग्णालयही बांधले जाणार आहे. तसेच एक संग्रहालय, ग्रंथालय, सामूहिक स्वयंपाकघरही येथे असणार आहे.

अशी असेल मशीद

ही मशीद दोन मजली असणार आहे. विशेष म्हणजे यात पारंपरिक घुमट नसून त्याचा आकार अंडाकार असेल. बांधकामावेळी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. मशिदीत एकावेळी जवळपास २ हजार लोक नमाजपठण करू शकतील. येथे सौरऊर्जेचा वापर केला जाणार आहे. मशिदीमध्ये महिलांसाठी एक वेगळी जागा असणार आहे. दोन वर्षांत या मशिदीचे बांधकाम पूर्ण होण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER