इंदु मिलमधील डॉ.बाबासाहेबांच्या पुतळ्याचे भूमिपूजनच झाले रद्द

Dr. Babasaheb Ambedkar

दादरमधील इंदू मिलच्या साडेबारा एकर जमिनीवर महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांचे भव्यदिव्य स्मारक उभारण्यात येणार आहे. त्या ठिकाणी बाबासाहेबांचा साडेचारशे फूट उंचीचा पुतळा उभारण्याचा निर्धार राज्यातील महाविकास आघाडी सरकारने केला आहे पण या पुतळ्याचा भूमिपूजन समारंभ रद्द करण्याची पाळी सरकारवर शुक्रवारी आली.

या स्मारकासाठी अकराशे कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी २०१५ मध्ये या स्मारकाचे भूमिपूजन केले होते. तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या कार्यकाळातील तो अत्यंत महत्त्वाचा निर्णय होता. दलित नेते अनेक वर्षे करीत असलेल्या आंदोलनाला अखेर यश आले आणि स्मारकाचा मार्ग फडणवीस यांनी मोकळा केला होता. त्यासाठीच्या आवश्यक त्या सर्व परवानग्या मिळविण्यातही फडणवीस यशस्वी झाले होते.

राज्यात महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) सरकार आल्यानंतर त्यांनीही हे स्मारक होणारच अशी ग्वाही दिली आणि पुतळ्याची उंची १०० फुटाने वाढविली. आधी १०० फूट उंचीचा चवथरा आणि २५० फुटाचा पुतळा असे फडणवीस सरकारने ठरविले होते. मात्र नव्या सरकारने ती पुतळा २५० फुटांऐवजी ३५० फूट करण्याचा निर्णय चार दिवसांपूर्वीच घेतला. आपले सरकार कसे आणि किती गतिमान आहे हे दाखविण्यासाठी की काय ऐन कोरोना काळात या पुतळ्याच्या भूमिपूजनाचा समारंभ शुक्रवारी आयोजित करण्याचे ठरले. गुरुवारी त्याची निमंत्रणे घाईघाईने पाठविण्यात आली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, या स्मारकासाठी लढा देणरे अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर, त्यांचे बंधू आनंदराज आंबेडकर यांच्यापैकी कोणालाही निमंत्रण नव्हते. अशोक चव्हाण, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील यांच्यासह राज्यातील बºयाच मंत्र्यांना या समारंभाची साधी कल्पनादेखील देण्यात आलेली नव्हती.

उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना गुरुवारी कळविण्यात आले तोवर ते पुण्याला निघून गेले होते आणि पुण्यात त्यांच्या दिवसभर भरगच्च बैठकी होत्या. सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचेही तसेच झाले. ते बीडसाठी आधीच रवाना झाले होते. कार्यक्रम आहे म्हटल्यानंतर पवार आणि मुंडे शुक्रवारी मुंबईला यायला निघाले. अजित पवार वाशीजवळ पोहोचले तेव्हा त्यांना समारंभ रद्द करण्यात आल्याचे कळविण्यात आले. ते पुन्हा पुण्याला निघून गेले. इकडे बहुतेक मंत्री, नेत्यांनी मुख्यमंत्री कार्यालयाकडे तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. शेवटी हा समारंभच रद्द करावा लागला.

या भयंकर नाराजीवर फुंकर घालणारे एक निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी सायंकाळी काढले.‘इंदू मिल येथे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक उभे करण्याची सर्वांची इच्छा आहे, यामध्ये कुठलाही पक्ष- संघटना असा भेदभाव असूच शकत नाही.अशा महत्वपूर्ण कार्यक्रमात सर्वांचा सहभाग असणे गरजेचे आहे हे मी लक्षात आणून दिले आहे आणि त्यामुळेच ठरविल्याप्रमाणे एक चांगला कार्यक्रम सर्व  आवश्यक मान्यवरांना निमंत्रित करून पुढील काही दिवसांत करावा असे निर्देश देण्यात आले  आहेत.त्यामुळे कुणीही या मुद्यावरून राजकारण करू नये’अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतली पण तोवर सरकार तोंडघशी पडले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER