आज बाळासाहेब स्मारकाचं भूमिपूजन, राज ठाकरेंसह विरोधी नेत्यांना निमंत्रण नाही

Maharashtra Today

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचा भूमिपूजन सोहळा आज सायंकाळी पार पडणार आहे. आज संध्याकाळी ५ वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) हस्ते हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. शिवाजी पार्क येथील महापौरांचे जुने निवासस्थान या स्मारकाची नियोजित जागा आहे. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात उपस्थितीत राहणार आहेत. मात्र एकेकाळचे जुने मित्र आता एकमेकांचे कट्टर विरोधक बनलेले विरोधी पक्षनेते देवेन्द्र फडणवीस यांच्यासह कोणत्याही विरोधी पक्षातील नेत्यांना निमंत्रण देण्यात आलेले नाही. विशेष म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांचे बंधू, आणि बाळासाहेबांच्या सानिध्यात वाढलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे(Raj Thackeray ) यांनाही या कार्यक्रमातून वगळण्यात आले आहे.

मुख्यमंत्रिपदावरून शिवसेना भाजपा यांच्यात काडीमोड झाला. शिवसेनेने भाजपासोबत असलेली युती तोडून थेट काँग्रेस-राष्ट्रवादीशी हातमिळवणी करुन सत्ता स्थापन केली. राज्यात शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांची महाविकास आघाडी बनली, शिवसेनेचे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. मात्र सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपाला विरोधी बाकांवर बसावं लागलं.

त्यानंतर शिवसेना आणि भाजपा यांच्यातील दुरावा वाढत गेला. त्यातच आता राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या भूमिपूजनाचं आमंत्रण दिल नसल्याचं समोर आलं आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मुख्यमंत्री असतानाच ठाकरे स्मारकाची घोषणा झाली होती. स्मारकासाठी अनेक परवानग्या देखील त्यांच्याच कार्यकाळात मिळाल्या होत्या. फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन या स्मारकाची घोषणा केली होती. त्यानंतर कागद हस्तांतरण कार्यक्रम पार पडला होता, मात्र आता या स्मारकाचं भूमिपूजन होत असताना देवेंद्र फडणवीस यांना कार्यक्रमापासून दूर ठेवण्यात आलं आहे. तर दुसरीकडे राज ठाकरे यांनाही कार्यक्रमातून वगळल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button