
मुंबई :- आज सकाळपासूनच स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या स्मारकाच्या भूमिपूजन सोहळ्याची चर्चा मुंबईच्या राजकीय वर्तुळात चर्चा होती. या कार्यक्रमाला राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांना निमंत्रण देण्यात आलं नसल्याच्या मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोप केले जात होते. तर सरकारकडून मात्र मोजक्या मान्यवरांच्या उपस्थितीतच सोहळा आयोजित केल्याचं सांगितलं जात होतं. या सर्व राजकीय पार्श्वभूमीवर संध्याकाळी ५.३० वाजता हा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला.
या सोहळ्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि राज्य सरकारमधील महसूल मंत्री बाळासाहेब थोरात हे महाविकास आघाडीतले तीन प्रमुख नेते उपस्थित होते. त्यामुळे एकूणच या सोहळ्याला महाविकासआघाडीचा (Mahavikas Aghadi) सोहळा असंच स्वरूप आल्याचं पाहायला मिळालं.
या सोहळ्यामध्ये सुरुवातीला बाळासाहेब ठाकरेंचे पुत्र आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते भूमिपूजनाचा विधी पार पडला. त्यानंतर त्यांच्या हस्ते स्मारकाच्या आवारातच वृक्षारोपण केलं गेलं. त्यानंतर महाविकास आघाडीतील दुसरा प्रमुख पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं. आणि सरतेशेवटी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते देखील वृक्षारोपण करण्यात आलं. त्यामुळे महाविकास आघाडीतील तिनही प्रमुख पक्षांच्या राज्यातील प्रमुख नेत्यांचा या सोहळ्यामध्ये सहभाग होता.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला