कोरेगाव भीमाप्रकरणी ४ एप्रिलला पवारांची साक्ष; चौकशी आयोगाने बजावला समन्स

bhima-koregaon-violence-commission-summons-sharad-pawar

मुंबई : कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना चौकशी आयोगाकडून समन्स बजावण्यात आलं आहे. कोरेगाव भीमा आयोगाकडून हे समन्स बजावण्यात आलं असून ४ एप्रिल रोजी आयोगासमोर हजर राहण्याचा आदेश देण्यात आला आहे. २०१८ रोजी पुण्यातील भीमा कोरेगाव येथे झालेल्या हिंसाचाराची कारणं आयोगाकडून तपासली जात असून त्याच पार्श्वभूमीवर हे समन्स बजावण्यात आलं आहे. यावेळी शरद पवारांची साक्ष नोंदवली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

भीमा- कोरेगाव प्रकरणाच्या चौकशीसाठी नेमण्यात आलेल्या आयोगाकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना साक्ष देण्यासाठी बोलविण्यात येणार असल्याची माहिती आयोगाचे अध्यक्ष न्या. जे. एन. पटेल यांनी यापूर्वीच दिली होती.

काही दिवसांपूर्वीच शरद पवार यांनी एसआयटीतर्फे कोरेगाव-भीमा प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली होती. देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात सत्ता आणि पोलीस यंत्रणेचा गैरवापर करून चुकीच्या लोकांना यामध्ये गुंतविण्यात आलं असल्याचे पवार यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात नमूद केले होते.

या पार्श्वभूमीवर वकील प्रदीप गावडे यांनी भीमा कोरेगाव प्रकरणी चौकशीसाठी नेमण्यात आलेल्या आयोगाकडे शरद पवार यांची साक्ष नोंदवून घेण्याची मागणी केली होती. पवारांकडे या प्रकरणी अधिक माहिती आहे का? याची खातरजमा करण्यासाठी त्यांना बोलवावे अशी मागणी वकील प्रदीप गावडे यांनी केली होती. ही मागणी मान्य करत आयोगाने आता शरद पवार यांना साक्षीसाठी बोलावण्याचा निर्णय घेतला आहे.

अखेर शिवसेनेने भाजप सोबतची मैत्री जपली!