भीमा कोरेगाव प्रकरणाचा छडा लावण्यासाठी पुणे पोलीस अमेरिकेची तपास संस्था ‘एफबीआय’ची मदत घेणार

मुंबई :- दरवर्षी १ जानेवारीला बौद्ध बांधव भीमा कोरेगाव येथे विजयस्तंभाला वंदन करण्यासाठी येतात. मात्र, २०१७ मध्ये शौर्यदिनाच्या या कार्यक्रमाला दंगलीचे रूप आले होते. त्या दंगलीचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटले. त्या दंगलीमागे कोणाचा हात होता, कोणाच्या सहभागामुळे ही दंगल झाली, अशा एक ना अनेक प्रश्नांची उत्तरं अद्यापही पोलिसांना मिळालेली नाही. त्यामुळे आता पुणे पोलीस भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणाचा तपास करण्यासाठी थेट अमेरिकेची तपास संस्था एफबीआयची (Federal Bureau of Investigation ) मदत घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी अटकेत असलेले वरावर राव यांच्याकडून जप्त करण्यात आलेल्या हार्ड डिस्कमधला डाटा मिळविण्यासाठी ही मदत घेण्यात येणार आहे. वरावर राव यांच्यावर माओवादी चळवळीला मदत करण्याचा ठपका आहे. पोलिसांनी राव यांच्या घरी छापा घालून काही हार्ड डिस्क जप्त केल्या होत्या. मात्र त्यातून मोठ्या प्रमाणावर डेटा डिलीट करण्यात आला. तो डेटा मिळविण्यासाठी पोलीस ही मदत घेणार आहे. यासाठी पुणे पोलिसांचं एक पथक अमेरिकेला जाणार आहे.

दरम्यान, हिंदू एकता आघाडीचे मिलिंद एकबोटे आणि शिव प्रतिष्ठानचे संभाजी भिडेंसह १६३ जणांना पुणे जिल्हाबंदी करण्यात आली आहे. कोरेगाव भीमा येथे १ जानेवारीला होणाऱ्या विजयस्तंभ अभिवादन समारंभाच्या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे. तसेच चार तालुक्यांमध्ये कलम १४४ (जमावबंदी) लागू करण्यात आले  आहे. दरम्यान, १ जानेवारी २०१८ रोजी पुणे जिल्ह्यातल्या कोरेगाव भीमामध्ये हिंसाचार झाला होता. या प्रकरणी संभाजी भिडे गुरुजी व मिलिंद एकबोटे यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.