भीम आर्मीच्या मेळाव्याला न्यायालयाकडून सशर्त परवानगी

Bhim-arm-nagpur-bench

नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भीम आर्मी यांची विचारधारा परस्परभिन्न आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता भीम आर्मीला मेळावा घेण्यास पोलिसांनी परवानगी नाकारली होती. मात्र आज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने भीम आर्मीला मोठा दिलासा दिला आहे. भीम आर्मीला न्यायालयाने कार्यकर्ता मेळावा घेण्यास सशर्त परवानगी दिल्याने उद्या २२ फेब्रुवारी रोजी भीम आर्मीचा रेशीम बाग मैदानावर कार्यकर्ता मेळावा पार पडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय रेशीम बागेजवळच आहे. शिवाय संघ आणि भीम आर्मीची विचारधारा एकसारखी नसल्याने भीम आर्मीला कार्यकर्ता मेळावा घेण्यासाठी परवानगी देण्यास कोतवाली पोलिसांनी नकार दिला होता. भीम आर्मीच्या मेळाव्यामुळे शहरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, असा दावा करीत पोलिसांनी मेळाव्याला परवानगी नाकारली होती. त्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयात सादर करण्यात आली. त्यावर न्या. सुनील शुक्रे आणि न्या. जे. जामदार यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. कोतवाली पोलिस ठाण्यातील निरीक्षकांनी शपथपत्र दाखल केले. त्यानुसार भीमआर्मीने यापूर्वी दोनदा रॅली व मेळाव्यासाठी परवानगी मागितली होती.

भीम आर्मीच्यावतीने बाजू मांडताना अ‌ॅड. फिरदोस मिर्झा यांनी या शपथपत्राचा विरोध केला होता. शहरात इतर ठिकाणी परवानगी देत असल्याने तिथे कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही काय, एका विशिष्ट संघटनेच्या कार्यालयामुळे परवानगी नाकारणे हे राज्य घटनेच्या चौकटीत बसणारे नाही. तसेच पोलिसांनी त्यासाठी ठोस कारणेही दिलेली नाहीत, असे त्यांनी नमूद केले होते. काल या याचिकेवर सुनावणी झाल्यानंतर त्यावरचा निर्णय कोर्टाने राखून ठेवला होता. आज त्यावर पुन्हा सुनावणी झाली असता कोर्टाने भीम आर्मीला मेळाव्यासाठी सशर्त परवानगी दिली आहे.

त्यासाठी भीम आर्मीला काही अटी घालण्यात आल्या आहेत. कार्यकर्ता मेळावाच होईल. त्याचे निदर्शने अथवा आंदोलनात परिवर्तन होणार नाही, सामाजिक तेढ निर्माण होईल किंवा दंगल उसळेल अशी जातीय, धार्मिक चिथावणीखोर वक्तव्ये मेळाव्यात करण्यात येऊ नये, मेळावा दुपारी २ ते ५ याच कालावधीत संपन्न झाला पाहिजे, सायंकाळी ६ वाजतापर्यंत रेशीमबाग मैदान पूर्ण रिकामे करण्यात यावे, भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांनी या अटींचे पालन होईल, अशी लेखी हमी न्यायालयाच्या निबंधकांकडे द्यावी, या अटींचं काटेकोर पालन करणं आयोजकांना बंधनकारक करण्यात आलं आहे.

दरम्यान, उद्या २२ फेब्रुवारी रोजी रेशीम बाग मैदानावर दुपारी २ वाजता भीम आर्मीची ‘हुंकार रॅली’ पार पडणार आहे. या रॅलीला भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद येणार असून भीम आर्मीच्यावतीने रॅलीची जय्यत तयारी करण्यात आली आहे.