भवानीच्या तळपत्या तलवारीने उघडले ऑलिम्पिकचे दरवाजे

Bhavani devi opened olympic doors for herself

नावात नक्कीच काहीतरी खास असते. आता हेच बघाना…विराट कोहली…नावाप्रमाणेच विराट कामगिरी करतोय. त्याचप्रमाणे भवानी देवी (Bhavani Devi) …जशी आई भवानीची दिव्य तलवार..त्याचप्रमाणे भवानी देवी नावाची खेळाडू तलवारबाजीत (Fencing) चमकतेय. ऑलिम्पिकसाठी (Olympic) पात्र ठरलेली ती भारताची पहिलीच तलवारबाज (पुरुष वा महिला) ठरली आहे.

गेल्यावर्षी साधारण याच काळात भवानीदेवी द्विधा मनस्थितीत होती. तिला काय करायचे तेच कळत नव्हते कारण ती इटलीतील लिव्होर्नो येथे प्रशिक्षक निकोला झनोटी यांच्या मार्गदर्शनात सराव करत होती. ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणारी पहिली भारतीय तलवारबाज ठरण्याच्या दिशेने तिची वाटचाल सुरु होती. त्याचवेळी कोरोनाने डोके वर काढले आणि सारे काही ठप्प झाले. गहिरे संकट म्हणजे ती इटलीमध्ये होती आणि त्यावेळी इटलीत कोरोनाचा प्रकोप सर्वाधिक होता. त्यामुळे इटलीत थांबायचे की मायदेशी परतायचे असा मोठा प्रश्न तिला पडला होता पण भवानी कशीबशी चेन्नई येथील आपल्या घरी परतण्यात यशस्वी ठरली होती. त्यानंतर लगेचच लाॕकडाउन लागले. बेल्जियममध्ये होणारी महिलांची सेबर विश्वचषक स्पर्धा रद्द झाली.टोकियो आॕलिम्पिकही वर्षभर पुढे ढकलले गेले.,

ऑलिम्पिककडे डोळे लावून बसलेल्या भवानीसाठी सर्व तयारी पुन्हा नव्याने करावी लागली. तिर एकटीनेच सराव करावा लागला. प्रशिक्षक झानोटीचे मार्गदर्शन आॕनलाईनच घ्यावे लागले. आठ महिने असेच गेले. त्यानंतर गेल्या नोव्हेंबरमध्ये ती पुन्हा इटलीतील लिव्होर्नो येथे गेली आणि मगच तिची व्यवस्थित तयारी सुरू झाली.

त्याचे फळ तिला रविवारी मिळाले. हंगेरीतील विश्वचषक स्पर्धेत भवानीने ऑलिम्पिकची पात्रता मिळवून इतिहास घडवला. टोकियो ऑलिम्पिकमध्ये महिला तलवारबाजीच्या वैयक्तिक सेबर गटाच्या स्पर्धेसाठी ती पात्र ठरली. भारताची तलवारबाज पहिल्यांदाच ऑलिम्पिकच्या व्यासपिठावर खेळणार हे स्पष्ट झाले.

तलवारबाजीच्या तिन्ही प्रकारात सेबर हा प्रकार सर्वात आक्रमक आणि सर्वाधिक चपळाईचा. त्यात भवानी आता जगात 42 व्या क्रमांकावर आहे. तिला हे स्थान टिकून राहिल अशी कामगिरी विश्वचषक स्पर्धेत करायची होती आणि ती तिने केली.

दोघांच्या भांडणात तिसऱ्याच लाभ असे तिच्यासाठी घडले. सांघिक स्पर्धेत कोरीयन संघाने हंगेरीला क्वार्टर फायनलमध्ये मात दिली आणि कोरियन संघाची ऑलिम्पिक निश्चिती झाल्याने जागतिक क्रमवारीनुसार आशिया- ओशियानिया गटासाठी दोन जागा वैयक्तिक गटात खुल्या झाल्या यापैकी एका जागेवर भवानीला संधी मिळेल हे निश्चित झाले मात्र त्यावर अधिकृत शिक्कामोर्तब 5 एप्रिलला होणार आहे.

गेल्या वर्षभरापासूनच्या या प्रवासाबद्दल भवानीने म्हटलेय की, टोकियो ऑलिम्पिकसाठी मी गेल्या काही वर्षापासून भरपूर मेहनत घेतली आहे पण मागचे वर्ष फारच कठीण गेले. पण कुणाच्याच हातची गोष्ट नव्हती. ऑलिम्पिक पुढे ढकलल्याचा निर्णय झाला तेंव्हा थोडी स्वस्थता आली आणि मी पुन्हा तयारीला सुरुवात केली.

तलवारबाजीसाठी भारतात पोषक असे काहीच नाही. वातावरण नाही, सुविधा नाहीत, स्पर्धा नाही..तरीसुध्दा या खेळात भवानीने आज स्वतःचे एक स्थान निर्माण केले आहे. तिचे वडील सी. सुंदररामन हे पुजारी आहेत तर आई सी.ए.रामानी या गृहिणी. त्यांनी तलवारबाजीतले काहीच माहित नसले आणि हा खेळ लोकप्रिय नसला तरी भवानीला हा खेळ खेळता यावा यासाठी शक्य ते सर्व केले. 2004 मध्येशाळेत असल्यापासून भवानीचा हा प्रवास सुरू झाला. एकवेळ अशी आली की 2013 !मध्ये ती खेळ सोडून देण्याच्या विचारात होती. भरपूर पैसा खर्च होत होता आणि पैसे जमवणे फार कठीण जात होते. पण ती खेळत राहिली आणि अशावेळी गो स्पोर्टस् फाउंडेशनची शिष्यवृत्तीचा तिला आधार झाला आणि भवानी तलवारबाजी सुरु ठेवू शकली. 2016 मध्ये ती इटलीत गेली. आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धा गाजवायला लागली. आठ वेळा ती राष्ट्रीय विजेती बनली.राष्ट्रकूल आणि आशियाई स्पर्धात तिने पदकं जिंकली. 2018 मध्ये रेक्याविक येथील आंतरराष्ट्रीय स्पर्धा तिने जिंकली आणि आता तिने ऑलिम्पिकचे दरवाजे मेहनतीने स्वतःसाठी उघडून घेतले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER