प्रेमा काय देऊ तुला ! भाग्य दिले तू मला !!

आज दिवाळीचा शेवटचा दिवस. पाडवा आणि भाऊबीज म्हणजे आनंदाची परिसीमा. आजचा आनंद म्हणजे भावा-बहिणीच्या प्रेमाचा, ( love of brother and sister)आणि पाडवा म्हणून वडील आणि मुलगी यांच्यातल्या मायेच्या धाग्याने गुंफलेला, आणि तितकाच पती-पत्नींच्या रेशीमगाठीत गुंतलेला. एकूणच आज आनंद ,प्रेम ,लाड ,कौतुक यांचा महापूर !

आणि प्रेम -प्रेम म्हणजे काय हो ? या नात्यातील गोडव्यातुन मिळालेले भाग्यच न ! त्यामुळे खरंतर त्यापुढे त्या ओवाळण्या म्हणजे फक्त टोकन असंच वाटत आलय मला ! खरेतर दोन दिवसाच्या माहेरवाशिणीला हक्काचं घर आणि लाड ,कौतुक करून घ्यायचं ठिकाण एवढेच काय ते केवळ बहिणींना हवे असते.बाकी तर केवळ नात्यांमधले बंध ,सगळे भाग्य उजळून देतात.

एकूणच सगळ्या नात्यांमध्ये हे सौंदर्य आहे ,म्हणूनच नात्यांचे विविध रंग मनाला भावतात. घराच्या चौकटीपासून ते विश्वाच्या उंबरठ्यापर्यंत कवेत घेण्याची ताकद या प्रेमात असते.

प्रेम हे दोन सजीव प्राण्यांमधील, दोन्ही बाजूनी होणारी देवाणघेवाण असते. एकतर्फी प्रेम असूच शकत नाही .एकतर्फी प्रेम फक्त वस्तूवर करता येतं असं .म्हणूनच एकतर्फी प्रेम करणारे बहाद्दर समोरच्या व्यक्तीला वस्तू समजून तिचं जीवनच उद्ध्वस्त करतात ,त्यांना प्रेम कळलेलंच नसतं. त्यांना जशी वस्तू आवडते, तशी समोरची व्यक्ती आवडते .आणि ती मिळणार नसेल तर जी राग, द्वेषाची भावना त्यांना निर्माण होणार असते ,ती केवळ मालकी हक्काने व्यक्ती रुपी वस्तूला विध्वंसक पद्धतीने ॲसिड टाकून जाळण्यामध्ये व्यक्त होते. या मानवतेला काळिमा फासणाऱ्या गोष्टी आहेत. त्याला प्रेम कसं म्हणणार ?

डॉक्टर लता काटदरे एका ठिकाणी म्हणतात, की नेमकी थोडक्यात व्याख्या व्हावी अशी मुळी प्रेम ही संकल्पनाच नाही. त्याची व्याख्या करायचा प्रयत्न म्हणजे आकाशाला गवसणी घालण्यासारखे व्हायचे.

  • प्रेम म्हणजे आपल्या आवडत्या व्यक्तीच्या अस्तित्वात आपण असं समरस होणं, त्यातून दोघांचाही विकास घडेल.प्रेम हा प्राणिमात्रांना घट्ट जोडून ठेवणारा एक दुवा तर आहेच .शिवाय बंध व अनुबंध ही आहेत.
  • आणि हे बंधानुबंधाचे वैशिष्ट्य म्हणजे ते एकमेकांना परस्परांशी किंवा अगदी एकाच वेळी एका माणसाला अनेकांशी ही जोडून ठेवतात.
  • मात्र ते कधी कुणाला एकमेकांशी जखडून ठेवत नाही. असा विचार करत गेलं की प्रेमाचा एकेक धागा उलगडत जातो.
  • जीवनातल्या प्रत्येक क्षणी आपल्या आयुष्यात असलेल्या आपल्या सभोवतालच्या प्रत्येक व्यक्तीवर आपण प्रेम करू शकतो.
  • आणि त्याच बरोबर मी स्वतःवरही प्रेम करू शकतो /शकते.
  • त्याचवेळी इतरांनी आपल्यावर केलेले प्रेम समजून घेणे हे आवश्यक आहे .आणि हे सगळं विनाअट असावं.
    वरील प्रेमाच्या कसोट्यांवर भाऊ -बहीण ,वडील-मुलगी किंवा पती-पत्नी यांचं नातं घेऊन घासून घेण्याचा मी प्रयत्न केला.

पूर्वीच्या एकत्र कुटुंबात किंवा जिथे जिथे भाऊ-बहिणी लहानपणी एकत्र राहू शकतात, तेथे हा अनुभव येतो. याठिकाणी माझा मुलगा, पुतण्या ,पुतणी एकत्र रहात होते, तो अनुभव नेहमीच मला आठवतो. खरेतर सगळेच बारावी ते एस वाय बीए पर्यंतचे. परंतु वरच्या सगळ्या कसोट्या मला त्यांना नकळत मला तेथे लावता आल्या. म्हणजे ते जे काय वागत होते ते इतक सहज सुंदर होतं. ताईची पूर्ण काळजी घेणे, वॉटर बॉटल आठवणीने भरून ठेवणे, तिची बिघडलेली गाडी स्वतः जाऊन गॅरेजला टाकून घेऊन येणे आणि या बरोबरच तिला त्रस्त करणे हेही या दोघांचे काम असायचे. आणि ताई म्हटल्याप्रमाणे खरंतर जेमतेम दोन वर्ष मोठी असूनही तिचं वागणं बघून बघून इतर दोघे खूप शिकलीत. एकदा का ते गप्पा करायला बसले की आम्ही सगळे फक्त एेकत राहतो .खूप मजा येते. खूप नवीन काही कळतं ,आणि त्यांना याच भानही नसतं .त्यांना त्यांच् त्रिकुट एकत्र येण पुरेसं असतं.

कधीही, कोणीही, कुठलाही पदार्थ एकटा खात नाही. आम्ही नकळत दुसऱ्याला नावं ठेवून बघितली तर ते आपापसात एकमेकांची बाजू घेऊन लढतात.ताईचा ड्रेसचा चॉइस दररोजचा करताना तिला हे भाऊ हवे असतात. “नाही ताई ,हा घाल !”असे फर्मान सुटते. मुख्य म्हणजे सल्लामसलत .परस्परांना ते निर्णयाला मदत करत असतात. पुढचे खाच-खळगे सांगतात, कुणाशी कस वागाव वगैरे डिस्कस करतात, आणि इतर क्षेत्रावर तर भन्नाट चर्चा ! परस्परांच्या मित्रमंडळींच्या ओळखी आपापसात करून दिल्याने त्यांचे वर्तुळ खूपच वाढले आहे.

प्रत्येकाचे रुटीन, प्रोग्राम्स, जाण्याच्या वेळा बरेचदा वेगवेगळे असतात. पण घराच्या किल्ल्या ,इतर कामाची मॅनेजमेंट परफेक्ट असते .कुठेच गैरसमज आणि गोंधळ होत नाही. यातूनच त्यांचा वाढलेला आत्मविश्वासही आम्हाला जाणवतो. केलेल्या कौतुकाचा स्वीकार आणि तितकेच दुसऱ्याला दिलेले ॲप्रिसिएशन हे ते शिकत आहेत. खरंतर दोघा भावांची फिल्ड टोटल वेगळी. पण त्याने फरक कुठे पडतो? हे त्यांच्याकडूनच शिकावं. तिघंही आपापल्या क्षेत्रांमध्ये खटपट करत आहेत आणि त्यातूनच खूप शिकतही आहेत.

हीच गोष्ट पती-पत्नीनाही लागू करता येईल. लग्न झाल्या झाल्या प्रेमाचे बंध निर्माण झालेले नसतात. ते कायदेशीर नातं असतं आणि सुरुवातीला आकर्षणापोटी ते लवकर जुळतही ! पण काळाच्या ओघात, परस्परांच्या सहवासात ,आलेल्या अनुभवातून ते जोडल्या जातं आणि काही कालावधीनंतर समरसता येत जाते.

परंतु यात महत्त्वाची गोष्ट असते परस्परांचा विकास. हे नातं समंजसपणा ,त्याग, विश्वास आणि खरंतर बिनशर्त स्वीकार असेल तर दोन्ही व्यक्ती परस्परांच्या विकासाला अनुकूल भूमिका घेतात.

लग्नानंतर वधु वर परस्परांशी तर जोडले जातातच पण त्याचबरोबर आपल्या पार्टनरला इतरांशी म्हणजे आपले कुटुंबीय व नातेवाईकांशी जोडून घेतल्या जातं. दुसऱ्यावर प्रेम करत राहणं आणि शब्दा वाचून कळले सारे ….याप्रमाणे समोरच्याच्या प्रेमाची ‘जातकुळी ‘ओळखून ते प्रेम स्वीकारणं, समजून घेणे या दोन्ही प्रक्रिया होत असतील तरच तिसरी पायरी खऱ्या अर्थाने घेतली जाते, स्वतःवर प्रेम करणं ! नाहीतर केवळ स्वतःवरच प्रेम करणाऱ्या वृत्ती कूपमंडूक वृत्तीने इतरांकडे डोळसपणे पाहून प्रेम वाटू शकत नाही.

सगळ्यात महत्त्वाची गोष्ट नाती ही गुंफलेली, रेशीमगाठीत गुंतलेली गोष्ट आहे .त्याचा रेशमीपाश असेल तोपर्यंत ठीक ! पण तोच पाश जर समोरच्याला जखडून टाकत असेल तर त्यामुळे समोरच्याची घुसमट ही होऊ शकते, त्यासाठी वारंवार स्वतःला तपासून बघायला लागतं.

थोडक्यात प्रेम हे प्रेम असत कि हो ! ते तेच जे परस्परांचा विनाअट स्वीकार करते, परस्परांचा विकास घडवते, बंधन निर्माण करते तरीही जखडून टाकत नाही. कमळाच्या पानांवरचे पाण्याचे थेंब किंवा दवबिंदूच जसे, म्हणाल तर स्वतंत्र ! एकत्र रूप लोभावणारे आणि तरीही अलिप्त, पानांवरून घसरणाऱ्या दवबिंदू सारखे !
फ्रेंड्स ! सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा !

मानसी गिरीश फडके.
समुपदेशक व सायकोथेरपिस्ट.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER