भटकळची सुनावणी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे

Yasin Bhatkal

पुणे (प्रतिनिधी) :- जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणातील मुख्य आरोपी इंडियन मुजाहिद्दीनचा संस्थापक यासीन भटकळ उर्फ शिवानंद (रा. भटकळ, जि. उत्तर कनडा, कर्नाटक) याला शिवाजीनगर येथील न्यायालयात व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे हजर करून खटल्याची सुनावणी होणार आहे. विशेष न्यायाधीश आर.एम.पांडे यांनी याबाबतचा आदेश दिला आहे.

13 फेब्रुवारी 2010 रोजी सायंकाळी 6 वाजून 50 मिनिटांनी जर्मन बेकरी येथे झालेल्या बॉम्बस्फोटात 17 व्यक्ती मृत्यूमुखी, तर एकूण 56 लोक गंभीर जखमी झाले होते. मृत्यू झालेल्यांमध्ये 5 आणि जखमींमध्ये 10 परदेशी नागरिकांचा समावेश होता. याबाबत बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर तपास एटीएसकडे सोपविण्यात आला होता. दरम्यान, एटीएसने केलेल्या तपासात गुन्ह्यात स्फोटामध्ये आरडीएक्स या स्फोटकाचा वापर केला असल्याचे निष्पन्न झाले होते. जर्मन बेकरी या गुन्ह्याच्या ठिकाणी भटकळ यानेच बॉम्ब ठेवल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्याच्याविरोधात दोषारोपपत्र दाखल झाले आहे. या पार्श्वभूमीवर भटकळ हा दहशतवादी आहे. त्याच्यावर देशातील विविध ठिकाणी अनेक मोठे गुन्हे दाखल आहेत. त्याला सुनावणीकरिता प्रत्येकवेळी हजर करणे सुरक्षेच्या कारणास्तव अवघड आहे. त्यामुळे त्याला व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे हजर करण्यात यावे, असा अर्ज दिल्ली येथील एका अधिकाºयाने केला होता. यावर व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारेच भटकळ याला न्यायालयात हजर करणे योग्य असल्याचा युक्तीवाद विशेष सरकारी वकील राजा ठाकरे यांनी केला आहे. तर, या सुनावणीसाठी भटकळ याला प्रत्यक्ष हजर करण्याची मागणी बचाव पक्षाचे वकील अ‍ॅड. जहिरखान पठाण यांनी केली आहे. दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने वरील आदेश दिला आहे.