
रत्नागिरी : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाच्या संजीवनीने महाराष्ट्रात भाजप मोठी झाली. ज्या झाडाने तुम्हाला मोठे केले आता त्याच झाडाला तुम्ही खायला निघाले आहात. त्यामुळे नियती कुणालाच सोडत नसते, असा निशाणा शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी भाजपवर लगावला. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी थेट गृहमंत्र्यांवर आरोप करत मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवले आहे. या प्रकरणावरून शिवसेना आमदार आणि माजी राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांनी विरोधकांचा समाचार घेतला.
भारतीय जनता पक्षाची नाराजी म्हणजे त्यांचा मुख्यमंत्री झाला नाही, ही आहे. भाजपला कळून चुकले आहे की, महाविकास आघाडी सरकार पाच वर्ष चाललं, तर २०२४ मध्ये देशात भाजप सरकार येणार नाही. छोट्या छोट्या प्रकरणात केंद्र सरकार राज्य सरकारच्या कारभारात हस्तक्षेप करतं आहे. एटीएसचा तपास पूर्ण होत आला असताना तो तपास एनआयएकडे वर्ग केले जाणे यातून स्पष्ट होत असल्याचं मत भास्कर जाधव यांनी व्यक्त केलं. नैतिकतेचे धडे भाजपने आम्हाला सांगू नये. गुजरातचे गृहमंत्री अमित शहा होते त्यावेळी पोलीस मुख्य डी. जी. वंजारी यांनी आरोप केले होते, त्यावेळी अमित शहा यांनी राजीनामा दिला का? मोहन डेलकरांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत नावं दिली, त्यांचं काय झालं? त्यामुळे भाजपला नैतिकतेच्या गोष्टी तोंडातून बोलता येतात; पण प्रत्यक्ष नैतिकता भाजपने कधीच पाळली नाही, असा टोला भास्कर जाधव यांनी भाजपला लगावला.
यावेळी परमबीर सिंहांच्या पत्रावर शंका उपस्थित करत त्यांनी अजून या साऱ्या प्रकरणाचा खुलासा का केला नाही? असा सवाल भास्कर जाधवांनी उपस्थित केला. देवेंद्र फडणवीस दिल्लीतून आल्यावर हे पत्र कसं काय पुढे आलं, यावर लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलतील, असंही भास्कर जाधव म्हणाले. लेटरबॉम्बवरून हल्लाबोल करणाऱ्या भाजप खासदार नारायण राणेंवर भास्कर जाधवांनी अप्रत्यक्ष निशाणा साधला. उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे अचानक मुख्यमंत्री झाले, ते मुख्यमंत्री झाले हे पचनी पडत नाही. त्यामुळे झोपेतसुद्धा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झालेले त्यांना दिसतात. मी मुख्यमंत्री झालो नाही आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, असं दिसतं. त्यामुळे वाचाळवीरांच्या बोलण्याकडे महाराष्ट्र लक्ष देत नाही, आम्हीही देत नाही, असं सांगत भास्कर जाधव यांनी नारायण राणेंचा समाचार घेतला.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला