भरतने घेतला धसका?

Bharat Jadhav

जवळपास अडीच दशकांपासून एकमेकांचे घट्ट मित्र असलेले अभिनेता भरत जाधव (Bharat Jadhav) आणि दिग्दर्शक केदार शिंदे यांची मैत्री त्यांच्या चाहत्यांना माहितीच आहे. महाराष्ट्राची लोकधारा या कार्यक्रमांमध्ये भरत आणि केदार यांची मैत्री जुळली आणि तेव्हापासून आजतागायत ते त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टीचे ते साक्षीदार आहेत. त्यांची मैत्री आता फक्त एकमेकांपुरतीच मर्यादित नसून एकमेकांच्या कुटुंबातसुद्धा ते समरस झालेले आहेत. या दोघांच्या आयुष्यात एक असा एक प्रसंग घडला की त्यानंतर भरतने केदारच्या आईला त्रास द्यायचा नाही असं ठरवलं. असा कुठला त्रास भरतने केदारच्या आईला दिला होता की त्यानंतर भरतने कानाला खडा लावला आणि त्यातून तो कुठली गोष्ट शिकला ? हा किस्सा खरोखरच एक अफलातून असा किस्सा आहे आणि नुकतीच एका मुलाखतीच्या निमित्ताने भरतने ही गोष्ट शेअर केली.

केदारच्या आईला अभिनेता धर्मेंद्र हा प्रचंड आवडतो. आवडतो हा शब्द देखील कमी पडावा की काय इतकी केदारची आई धर्मेंद्रसाठी क्रेझी आहे. धर्मेंद्रचा एकही सिनेमा त्या चुकवत नसत. केदार त्यांच्या पोटात होता तेव्हाही त्यांनी धर्मेंद्रचे अनेक सिनेमे थिएटरमध्ये जाऊन पाहिले. केदारचा जन्म झाला त्याच्या आदल्या दिवशीच त्याच्या आईने धर्मेंद्रचा सिनेमा पाहिला होता आणि दुसऱ्याच दिवशी केदारचा जन्म झाला. केदार आणि भरत यांची क्लोज मैत्री असल्यामुळे जेव्हा भरतला हे कळलं की केदारची आई धर्मेंद्रची खूप फॅन आहे आणि केदारच्या जन्माच्या आदल्याच दिवशी तिने धर्मेंद्रचा सिनेमा पाहिला होता आणि दुसऱ्या दिवशी केदारचा जन्म झाला हे कळल्यानंतर भरतने तेव्हापासून केदारच्या आईला धर्मेंद्र की माँ असं म्हणायला सुरुवात केली. केदार च्या आई धर्मेंद्रच्या खूपच फॅन असल्यामुळे भरतकडून जेव्हा ही हाक मारली जायची तेव्हा त्यांनाही खूप आनंद व्हायचा आणि मग जेव्हा जेव्हा भरत केदारला भेटायला केदारच्या घरी यायचा तेव्हा तो धर्मेंद्र की माँ असं म्हणूनच पुढे गप्पांची सुरुवात करायचा. धर्मेंद्र की माँ असं म्हटलं की त्या खूप हसायला लागायच्या. खूप वर्ष हा सिलसिला सुरू होता. पण एक दिवस असा आला की धर्मेंद्र की माँ असं भरतने केदारच्या आईला नेहमीप्रमाणे म्हटलं आणि त्यानंतर त्या नेहमीप्रमाणे हसायला लागल्या आणि हसता हसता अचानक तो हर्षवायू इतका टोकाला गेला की त्या कोसळल्या. त्यांना लगेच उपचारासाठी दवाखान्यात नेलं, त्यांच्यावर उपचार झाले त्या बऱ्या देखील झाल्या पण तो क्षण भरतसाठी धक्कादायक होता.

ती आठवण सांगताना भरत म्हणाला, केदारच्या आईचा वाढदिवस होता आणि नेमका त्यादिवशी माझ्या नाटकाचा प्रयोग होता. त्यामुळे मी वाढदिवसाला घरी पोहोचू शकत नव्हतो. दरम्यान केदारचा मला फोन आला की सगळे पाहुणे जमलेले आहेत आणि तिच्या मैत्रिणी आलेल्या .आहेत. फक्त तूच इथे नाहीस नाही. त्यामुळे ती तुझी आठवण काढतेय. तू येऊ शकत नसलास तरी तिला एक फोन कर. थोड्याच वेळात मी त्याच्या आईला फोन केला आणि आमच्यात नेहमीप्रमाणे संवाद सुरू झाला ज्याची सुरुवात धर्मेंद्र की माँ याच वाक्याने झाली. हे वाक्य ऐकून नेहमीप्रमाणे त्या हसायला लागल्या. त्यांच्या वाढदिवसासारखा आयुष्यातला महत्त्वाचा दिवस ,सगळ्या मैत्रिणी आणि नातेवाईक जमल्यामुळे आधीच खूप आनंदी होत्या आणि त्यात त्यांच्या आवडीची अशी धर्मेंद्र की माँ ही हाक माझ्याकडून ऐकल्याने त्यांना इतका आनंद झाला की त्या आनंदातच कोसळल्या. काय झालं हे कळायच्या आतच वाढदिवसासाठी जमलेले सगळेजण गोंधळून गेले. लगेच त्यांना दवाखान्यात नेलं, त्यांच्यावर उपचार झाले. डिस्चार्ज घेऊन घरी आल्या तेव्हा मी त्यांना भेटायला गेलो. तोपर्यंत मला सगळा प्रसंग केदार कडून समजला होता. त्या दिवसापासून मी त्यांना धर्मेंद्र की माँ अशी हाक मारणं बंद केलं आणि मी आई असं म्हणूनच त्यांच्याशी बोलायला लागलो. माझ्यासाठी सुद्धा केदारच्या आईला नेहमीप्रमाणे धर्मेंद्र की माँ असं न म्हणणं हे खूप कठीण होतं. कारण ही गोष्ट फक्त मी आणि आई दोघेही एन्जॉय करत होतो. मी असं म्हटल्यानंतर त्यांना दरवेळी होणारा आनंद त्यांच्या असा जीवावर बेतण्यापर्यंत जाईल याचा मी जराही विचार केला नव्हता . ही गोष्ट त्यावेळेला माझ्या मनाला खूप झोंबली. नंतर त्या जेव्हा बऱ्या झाल्या तेव्हा या विषयावर मी आणि केदारची आई शांतपणे बोललो आणि त्यानंतर तेव्हापासून मी धर्मेंद्र की माँ हा शब्द आमच्या दोघांच्या नात्यातून कायमचा वजा केला.

केदार आणि भरत यांनी आजपर्यंत अनेक नाटक, मालिका, सिनेमा यामध्ये एकत्र काम केले आहे. अर्थात भरत पडद्यावर तर केदार पडद्यामागे राहून त्यांनी केलेले एकत्र काम हे प्रेक्षकांनी नेहमीच डोक्यावर घेतले आहे. सध्या केदार दिग्दर्शित करत असलेल्या सुखी माणसाचा सदरा या मालिकेत भरत चिमणराव ही भूमिका साकारत आहे. या दोघांची मैत्री जितकी घट्ट आहे तितकेच त्यांच्या आयुष्यातील असे काही प्रसंग आहेत जे अशा गप्पांच्या ओघात ओठावर येतात आणि ते जेव्हा चाहत्यापर्यंत पोहोचतात तेव्हा त्यांच्या मैत्रीला एक वेगळाच भावनिक रंग येतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER