‘भारत के महावीर’मध्ये दिसणार देशभरातील 12 कोरोनायोद्धे

Bharat Ke Mahaveer

कोरोना (Corona) काळात देशातील अनेकांनी आपल्या जीवावर उदार होऊन कोरोनाग्रस्तांसह सामान्य नागरिकांचीही मदत केली. अत्यंत निस्वार्थपणे त्यांनी केलेली ही मदत आता भारत के महावीर (Bharat Ke Mahaveer) या लघुपटातून प्रेक्षकांसमोर आणली जाणार आहे. संयुक्त राष्ट्र समिती, देशाचा नीति आयोग आणि डिस्कव्हरी इंडिया चॅनेलने हे शिवधनुष्य हाती घेतले असून ते आता जवळ-जवळ पूर्ण झाले आहे. या लघुपटाचा पहिला ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिया मिर्झा आणि सोनू सूद करीत आहेत. लॉकडॉऊनच्या काळात सोनू सूदने श्रमिकांना घरी जाण्यास मदत केली होती आणि आजही तो मदत करीत आहे. नोव्हेंबर महिन्यात ही मालिका प्रसारित केली जाणार असून याचे एकूण तीन भाग तयार करण्यात येणार आहेत.

भारत के महावीरबाबत बोलताना सोनूने सांगितले, गेले सात आठ महिने खूपच कठिण गेले. लोकांना खूप त्रास झाला. अशा वेळेस अनेकांनी पुढे येऊन संकटातील लोकांना मदत केली. मी या काळात जे काही काम केले त्याची प्रेरणा मला देवानेच दिली. देवाने मला जे काही दिले ते मी काही अंशी परत करण्याचा प्रयत्न केला. अर्थात माझ्याकडे साधनसंपत्ती असल्याने मला ते शक्य झाले. मात्र असेही काही हीरो आहेत ज्यांच्याकडे काहीही नसताना त्यांनी लोकांना मदत केली. अशाच लोकांना आम्ही सलाम करणार आहोत असेही तो म्हणाला.

नीति आयोगाचे अध्यक्ष अमिताभ कांत यांनी सांगितले, कोविड संकटात देशातील अनेकांनी आपल्या ड्यूटीच्या खूप पुढे जाऊन लोकांना मदत केली. स्वतःकडे तुटपुंजी सामग्री असतानाही अनेकांनी लोकांना मदत केली, त्यामुळेच अशा हीरोंना लोकांसमोर आणून त्यांचा सन्मान करण्याचा विचार आम्ही केला. आमच्या या मोहिमेला संयुक्त राष्ट्र संघ आणि डिस्कव्हरी इंडियानेही साथ दिली. त्यामुळे मी आनंदी आहे.

दिया मिर्झाने म्हटले की, लॉकडाऊनच्या काळात आपण पाहिले की, लोक कसे एकत्र आले आणि कसे एकमेकांना मदत करू लागले. आपण कितीही वेगळ्या धर्मात, जातीत असलो तरी संकटाच्या काळात आपण एकत्र येतो. अनेकांनी जीवावर उदार होऊन लोकांना मदत केली. देशभरातील अशा हीरोंना आम्ही यातून देशातील नागरिकांसमोर आणत आहोत. मला एक भारतीय म्हणवून घेण्यात गर्व वाटतो असेही दियाने सांगितले.

नोव्हेंबर महिन्यात डिस्ने प्लस हॉटस्टारवर सुद्धा याचे स्ट्रीमिंग होणार आहे. पूर्ण जगात भारत के महावीरचे प्रसारण केले जाणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER