भारत भालकेंचा वारसा आता मुलगा चालवणार, विठ्ठल साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी बिनविरोध

Bharat Bhalke - Bhagirath Bhalke

पंढरपूर : पंढरपुर (Pandharpur) येथील राष्ट्रवादीचे (NCP) नेते, शरद पवारांचे (Sharad Pawar) विश्वासू, निकटवर्तीय भारत भालके (Bharat Bhalke) यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर आता त्यांचा वारसा त्यांचा मुलगा भगीरथ भालके (Bhagirath Bhalke) चालवणार आहेत. पंढरपूरच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे दिवंगत आमदार भारत भालके यांच्या सुपुत्राची वर्णी लागली आहे. भगीरथ भालके यांची चेअरमनपदी बिनविरोध निवड झाली. भारत भालके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या अध्यक्षपदाचा एकमताने फैसला झाला. सहाय्यक निबंधक एम एस तांदळे यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाच्या बैठकीत ही निवड झाली.

भारत भालके यांचे 28 नोव्हेंबर 2020 रोजी वयाच्या 60 व्या वर्षी निधन झाले. कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांची प्रकृती बिघडली होती. पुण्यातील रुबी हॉल क्लिनीकमध्ये उपचार सुरु असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली.

भारत भालके हे पश्चिम महाराष्ट्रातील मातब्बर नेत्यांपैकी एक होते. 1992 साली ते तालुका स्तरावरील राजकारणात सक्रिय झाले. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक म्हणून त्यांनी कारकिर्दीला सुरुवात केली. 2002 पासून त्यांनी कारखान्याच्या अध्यक्षपदावर कायम वर्चस्व ठेवले. भारत भालके यांनी सलग 18 वर्षे विठ्ठल कारखान्याची धुरा सांभाळली होती.

कारखान्याच्या संस्थापकांच्या नातवाचे आव्हान

भारत भालके यांच्या निधनानंतर विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या संचालकांमध्ये मोठी दुफळी निर्माण झाली होती. कारखान्याचे संस्थापक औदुंबरआण्णा पाटील यांचे नातू युवराज पाटील यांनी चेअरमनपदासाठी उघडपणे दंड थोपटले. होते तर भारतनानांचे समर्थक मात्र भगीरथ भालकेंसाठी आग्रही होते.

18 संचालकांची भगीरथ भालकेंना पसंती

चेअरमनपदासाठी भगीरथ भालके यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची निवड बिनविरोध झाल्याचे निवडणूक निर्यण अधिकारी एस. एस. तांदळे यांनी जाहीर केले. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात ही निवड करण्यात आली. कारखान्याच्या एकूण 21 पैकी 3 संचालकांचे निधन झाले आहे. आज बैठकीला उपस्थित असलेल्या 18 संचालकांनी भगीरथ भालके यांच्या नावाला पसंती दिली. भगीरथ भालके हे गेल्या दहा वर्षांपासून संचालक मंडळात काम करत आहेत.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार पाच सहा दिवसांपूर्वी भालके यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी सरकोली येथे आले होते. त्यावेळी पवारांनी भगीरथ भालके यांना संधी देण्याचे सूतोवाच केले होते. त्यानुसार आज झालेल्या बैठकीत सर्वच संचालकांनी भगीरथ भालके यांच्यावर विश्वास दाखवत त्यांची बिनविरोध निवड केली. निवडीनंतर विठ्ठल परिवाराचे नेते कल्याणराव काळे यांनी भगीरथ भालके यांचा सत्कार करुन शुभेच्छा दिल्या. यावेळी भालके समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER