शेतकी विधेयकाचा विरोध, आज ‘भारत बंद ‘ची हाक

Bharat Bandh - Agriculture Bill

मुंबई :- नव्या कृषी विधेयकांच्या विरोधात विविध शेतकरी संघटनांनी शुक्रवारी ‘भारत बंद’चा नारा दिला आहे. काँग्रेसने गुरुवारी दोन महिन्यांच्या देशव्यापी आंदोलनाची सुरुवात केली. केंद्र सरकारने बहुमताच्या जोरावर संसदेत कृषी विधेयके मंजूर केली असली तरीही त्यातून शेतकरी हित साधले जाणार नाही, अशी भूमिका घेत अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीने आज ‘भारत बंद ‘ (Bharat Bandh) ची हाक दिली आहे. या बंदमध्ये देशभरातील विविध शेतकरी संघटना, राजकीय पक्ष आणि शेतकरी सहभागी झाले आहेत. दरम्यान, या बंदच्या पार्श्वभूमीवर पंजाबमधील (Punjab) किसान मजदूर संघर्ष समिती आक्रमक झाली असून आज सकाळपासून अमृतसरमध्ये रेल रोको आंदोलन सुरु केले आहे.

केंद्राने मंजूर केलेल्या शेतकी विधेयकांच्या विरोधात पंजाबमधील शेतकऱ्यांनी गुरुवारी तीन दिवसांचे ‘रेल रोको’ आंदोलन सुरू केले. त्यांच्याशी संघर्ष टाळण्यासाठी रेल्वेने अनेक गाडय़ा स्थगित केल्या.

या आंदोलनामुळे २४ ते २६ सप्टेंबर दरम्यान विशेष गाडय़ांच्या १४ जोडय़ा धावणार नाहीत, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले. प्रवाशांची सुरक्षा लक्षात घेऊन, तसेच रेल्वेच्या मालमत्तेचे नुकसान होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे ते म्हणाले.

स्थगित करण्यात आलेल्या गाडय़ांमध्ये अमृतसर- मुंबई सेंट्रल गोल्डन टेंपल मेल, हरिद्वार- अमृतसर जनशताब्दी एक्स्प्रेस, नवी दिल्ली- जम्मूतावी, अमृतसर- न्यू जलपैगुडी कर्मभूमी एक्स्प्रेस, नांदेड- अमृतसर सचखंड एक्स्प्रेस आणि अमृतसर- जयनगर शहीद एक्स्प्रेस यांचा समावेश असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. अनेक मालगाडय़ा व पार्सल गाडय़ांच्या वेळाही बदलण्यात आल्या आहेत. करोना (Corona) महामारीमुळे सध्या नियमित प्रवासी गाडय़ांच्या सेवा स्थगित आहेत.

‘रेल रोको’चे आवाहन किसान मजदूर संघर्ष समितीने केले होते आणि नंतर अनेक शेतकरी संघटनांनी त्याला पाठिंबा जाहीर केला. भारतीय किसान युनियनच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी सकाळी बर्नाला व संगरूर येथे रेल्वे रुळांवर ठाण मांडले; तर किसान मजदूर संघर्ष समितीच्या झेंडय़ाखाली शेतकऱ्यांनी अमृतसरमधील देवीदासपूर खेडय़ाजवळ आणि फिरोजपूरमधील बस्ती टंकावाला येथे रुळांवर धरणे देण्याचे ठरवले होते.

दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनेही शेतकरी संघटनांच्या भारत बंदला पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे. केंद्रामध्ये सरकारने मंजूर केलेली कृषी विधेयक विधेयके म्हणजे शेती व शेतकरी यांना उद्ध्वस्त करण्याचाच डाव आहे. या विधेयकांमुळे आगामी काळात भांडवलदारांकडून शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर लूट होणार आहे, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून सांगण्यात आले आहे. आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांच्या नेतृत्वाखाली कृषी विधेयकाचे शेतामध्येच दहन करण्यात येणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER