Bhandup Fire : आग कुठे व कशी लागली, पीएमसी बँकेशी संबंध काय; देवेंद्र फडणवीस

Maharashtra Today

मुंबई : राज्यात पुन्हा एकदा आगीच्या दुर्घटनेने काहींना जीव गमवावा लागला. भांडुपमधील ड्रीम मॉल सनराइज रुग्णालयात लागलेल्या आगीत १० जणांचा मृत्यू झाला. या लागलेल्या आगीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी संशय व्यक्त केला आहे. आगीबाबत अनेक संभ्रम आहेत. ही आग नेमकी कुठे लागली? कशी लागली? तिचा पीएमसी बँकेशी (PMC Bank) संबंध काय? असे अनेक प्रश्न फडणवीस यांनी उपस्थित केला आहे. या आगीचा संबंध बँकेशी जोडल्याने अनेक तर्कवितर्क लावले जात आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज भांडूपच्या ड्रिम मॉलमध्ये लागलेल्या आगीची पाहणी केली. यावर त्यांनी संशय व्यक्त केला आहे. “झालेली घटना अत्यंत गंभीर आहे. हे कोव्हिड रुग्णालय या ठिकाणी तात्पुरते सुरू झाले. भंडाऱ्याच्या घटनेनंतर सर्व रुग्णालयांचे ऑडिट आम्ही करू अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. विशेषत: तातपुरत्या स्वरुपातील रुग्णालयांची फायर ऑडिट झाली पाहिजेत, अशी मागणी करण्यात आली होती. हे ऑडिट करू अशी सुचनाही देण्यात आले होते. मात्र, तसे काहीही झालेले दिसत नाही.” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. .

पालिकेचा ढिसाळपणा

“या मॉलमध्ये आग लागल्यानंतर रेस्क्यूसाठी जागा नव्हती. आगीबाबत अनेक संभ्रमाच्या गोष्टी आहेत. आग नेमकी कुठे लागली?, कशी लागली?, पीएमसी बँकेशी संबंध काय?, काही दुकानदार सांगतात, आमची केस होती म्हणून आग लागली. जी घटना घडली त्यामध्ये बीएमसीचे दुर्लक्ष आणि ढिसाळपणा स्पष्ट दिसतोय.” असे फडणवीस म्हणाले.

दोषींवर कारवाई करा

अशा घटनांच्या माध्यमातून आपण अजून किती मृत्यू होण्याची वाट बघत आहोत. उद्या अशी घटना इतर सेंटर्समध्ये झाली तर जबाबदार कोण? अशा घटना होऊ नयेत यासाठी खबरदारी घेणे आवश्यक आहे. चौकशी होऊन दोषींवर कारवाई करावी. फायर सेफ्टी ऑडिट झाले नसेल, तर जबाबदार लोकांवर कारवाई करा, अशी मागणीही त्यांनी केली.

मागील दोन महिन्यांपूर्वी या ठिकाणचे फायर ऑडिट होऊनही फायर सेफ्टी नसतानाही कोणतीही कारवाई झाली नव्हती, ही बाब लक्षात आणून देताच देवेंद्र फडणवीस यांनी सरकारकडे कारवाईची मागणी केली. बेकायदेशीर रुग्णालये, बांधकामे यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे, पण पालिकेतच इतका भ्रष्टाचार आहे की, आता थेट उच्च न्यायालयानेच यामध्ये लक्ष देणे गरजेचे असल्याचा मुद्दा त्यांनी अधोरेखित केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER