भांडू या सौख्यासाठी !

भांडू या सौख्यासाठी

“कधीतरी भांडण अगदी टोकाची होतात. कधीतरी वाटतं निघून जावं ,पण संस्कार आडवे येतात. पण इतर वेळा आम्ही खूपच छान असतो. वेगवेगळ्या विषयावर चर्चा करतो . मुलाबरोबर मस्ती करतो आणि मला वाटत तो आता रागवेंल तेव्हा तो रागवत नाही आणि कधीतरी काही शुल्लक कारणावरून चिडतो.”

समोर बसलेली क्लाइंट सांगत होती. बहुतेक वेळा वैवाहिक समुपदेशनात हे फार कॉमन आहे. पण बहुतेक जण भांडण म्हणजे केवळ सुसंस्कृतपणाचे लक्षण आहे असे समजतात आणि आपल्या स्वतःला त्या प्रतिमेला आदर्शाचा मुलामा द्यायला बघतात. पण मला वाटतं हा मुखवटा पांघरण्याची वेळ जवळच्या नात्यांमध्ये यायला नको. कारण माणसा – माणसागणिक स्वभाव वेगळे ,विचार आणि यांची विचार पद्धती वेगळ्या . मतभेद हे होणारच ! म्हणून कायम परस्पर विरोधी चेहरे करून बसणे आणि एकमेकांची तोंडेही न बघण्याची इच्छा होणे हे जरा अतीच होतं .नाही का ? नाती रक्ताची असतील तर पालक, पूर्व परिस्थिती ,अनुभव एक असतात .त्या आठवणी काढतांना मजा येते. जोडीदाराबरोबर ही वर्तमान काळ उज्वल करता येतो ,आनंदी करता येतो आणि दोघे मिळून मुलांसह भविष्यकाळाची स्वप्न बघता येतात आणि मैत्र ! हे असे एक अद्भूत रसायन आहे जे भूत, वर्तमान, भविष्यच्या पलीकडे फक्त आणि फक्त आनंदाची उधळण करते निरपेक्षपणे !

म्हणूनच वर उल्लेख केलेल्या क्लायंटला मी सांगते, भांडण ही एक मूलभूत प्रवृत्ती आहे पण त्यातून मन साफ होतात .परत पुढील वाटचालीला मोकळे. अशा या भांडणांचा मी विचार करते, अभ्यास करते तेव्हा अनेक गोष्टी समोर उलगडत जातात. कटाक्षाने आपण एखादी गोष्ट टाळू बघतो, विचार नाकारायला बघतो, तेव्हा हमखास तेच विचार मनात येतात हा मनाचे वैशिष्ट्य आहे म्हणा ना. स्नेहलला तिच्या मैत्रिणीची एक सवय अजिबात आवडत नाही, डोक्यात जाते. परंतु ती जाता कामा नये असेही ठरवते कारण समोरच्या व्यक्तीवर कंट्रोल करणारे आपण कोणी नाही हे तिला कळतं. पण आपण हे जितके टाळू तितके भांडण जवळ येते, अगदी मानगुटीवर बसते. उलट सतत त्याच गोष्टीकडे लक्ष जाऊन भांडण होण्याची खात्री होते. ही बाब मला नको म्हटलं की हमखास घडते. म्हणूनच सगळ्या नात्यांमध्ये येणारा हा सहजच व्हावा आहे हे लक्षात घेऊ या.

सहकारी, कामाच्या ठिकाणी एकत्र असणारे, रूम पार्टनर, यांच्या मनात कायम वाटणारा विचार म्हणजे, सतत भांडण होईल का ? समोरची व्यक्ती आपल्या श्रेष्ठत्वाचा अधिकाराचा वापर करून आपला अपमान करील का ? अशावेळी तो तिचा स्वभावच आहे हे जर आपल्या लक्षात आले तर आपला स्व संवाद बदलून आपला हा त्रास देणारा विचार किंवा चिंता दूर करू शकतो. खरी परिस्थिती अशी असते की त्या एखाद्या विशिष्ट व्यक्तीचे बालपण भांडणे बघतच गेले असेल, स्वतःच्या स्वभावाने, कूरकूरीने, तणावाखाली राहून भांडणं उपसून काढून ती परिस्थिती निर्माण करून बघते. त्यासाठी अनेक कारणे दाखवते. खाजवुन खरुज काढणे या सारखाच हा प्रकार म्हणता येईल.

भांडण ठरवून करण्याची गोष्ट नाही. हा ! एक उदाहरण आहे. डॉक्टर अनिल अवचट आणि डॉक्टर अनिता अवचट यांची भांडणाची एक मेथड होती. ठरवून अर्धा तास ,एका खोलीत वेळ ठरवून घड्याळ लावून ते भांडण करत आणि वेळ संपला की भांडण थांबवत. आणि मग जणू काही काही झालेच नाही. असे वातावरण असे. थोडक्यात कामाच्या मध्ये ते येऊ नये आणि त्याचा मुलींवर परिणाम होऊ नये म्हणून, किंवा ठराविक वेळ केलं तर ते मुद्देसूद होतं. हा त्यामागे उद्देश होता. या पद्धतीने उगीचच होणारे भरकटले पण थांबवले जाते.

अर्थात म्हणून,” खूप दिवसात भांडण झालं नाही बुवा ! चला भांडू या !” असं भांडण कुणालाही उपयोगाचं नसते. बरेचदा उगीचच समोरच्याचे ट्रिगर पॉईंट माहीत असल्याने ते दुखावून भांडण सुरू केल्या जाते. यासाठी मुळात आपल्या कुठला ट्रिगर पॉईंट बनूच न देणे, म्हणजे आपल्या भावनांची किल्ली दुसऱ्याच्या हातात न देणे. आपला कंट्रोल दुसऱ्याच्या हातात आपल्या परवानगीशिवाय येताच कामा नये.

भांडावस वाटतो त्याक्षणी कधीही भांडू नये .कारण त्यामुळे नको त्या सगळ्याच भावनांचा निचरा होऊन समोरचा व्यक्ती प्रचंड दुखावला जातो .पण म्हणून अगदी मुहुर्त बघून ठरवलेल्या वारी, दिवशीच बोलले जावे असेही नाही. त्यामुळे तो मुद्दा आपल्या सतत डोक्यात राहून स्वतःलाच त्रास व्हायचा .म्हणूनच फक्त भावनातिरेकाने नाती तुटायला नको एवढेच!

भांडण मुलांसमोर नकोतच . विशेषतः त्यांच्यावरून जी भांडणं होत असतील, उदाहरणार्थ त्यांच्या अभ्यासावरून, होमवर्क न करण्यावरून तर ते त्यांच्यासमोर मुळीच नको .कारण ते स्वतःला दोषी समजून अपराधी समजतात. बरेचदा मुलांसमोर जर भांडणे होऊ दिली तर ती बरीच मुद्यांना धरून तर्कशुद्ध होऊ देखील शकतात .पण परत हेच की तेवढा समजुतदारपणा असेल तरच.

खरंतर भांडण हा प्रश्न नाही पण ते कसे आहे हे महत्त्वाचे. भांडणांमुळे भावनांचा निचरा होतो. उद्रेक होईपर्यंत त्या नाही वाढतं. म्हणूनच लहान मुलांची भांडण बघा .सारखी थोड्या थोड्या वेळाने होतात आणि मिटतातही !

भांडण म्हणजे आवाज वाढवणे नाही, काहीतरी करून आपलीच बाजू खरी करणे नाहीच नाही . ते तर्काला धरून असावे. वितंडवाद घालायचा असेल तर न भांडलेले बरे ! कारण त्यातून निष्पन्न शून्य होते. शारीरिक व मानसिक आजारी व्यक्तींशी भांडण्यात कुठलाच हशील नसतो, मोठेपणा नसतो.

तसेच आपल्या जवळच्या व्यक्तीच्या मर्यादा आपल्याला माहिती असतात. म्हणून त्याला तेवढा स्पर्शही करू नये. आपली जवळची व्यक्ती कुठला विषय सहन करू शकणार नाही तिथे आग लावायला जायचंच कशाला ?

प्रत्येक भांडणात ,”चुकलंच माझं ! माझं नेहमीच चुकतं आता किती वेळ माफी मागू ?”हे उद्गार भांडण केवळ थांबवतात. पण समोरच्या मनातून तुम्ही कायमचे उतरलेले असतात. बरेच असे भांडण वा वितंडवाद या जोडप्यांमध्ये होतात, ज्यांच्यात काही संवादच उरलेला नसतो.

फ्रेंड्स ! आपल्या दररोजच्या वापरातील अनेक साधने आपण वापरत असतो. स्वयंपाक घरातील पूर्वीचा पाटा-वरवंटा किंवा खलबत्ता किंवा कढईत झारा, पातेलं उलथन, या साधनांचा निरीक्षण केलं कधी ? या जोडगोळीतील एक साधन स्थिर असते, दुसरे अस्थिर. पोळपाट ,खल ,पातेले ,कढई स्थिर राहते म्हणूनच पोळी लाटली जाते, भाजी ,आमटी ढवळली जाते. खल स्थिर असतो म्हणूनच बत्याचे घाव सोसून, छान चटणी होते.

म्हणजे एक जण चिडला, रागवला, संतापला तर दुसऱ्याने शांत रहायचे . पण तुम्ही म्हणाल एकानेच हा ठेका घेतला आहे का ? मुळीच नाही. पण एकाने जर दोन चार वेळा खलाची भूमिका घेतली, तर बत्ता आपली भूमिका नक्कीच बदलतो, स्वीच ऑफ करतो. त्याचा आवेश ,अहंकार गळून पडतो .आणि मग व्हायचं दुसऱ्याने बत्ता आणि कुटायचे समोरच्याला.

थोडक्यात काय भूमिकांची परिस्थितीनुरूप अशी आदलाबदल करायची एवढंच ! पण भांडण सोडायचं नाही ह ! कारण फ्रेंड्स, भांडण हे सौख्यासाठी आहे हेच खरं .

मानसी गिरीश फडके
(समुपदेशक व सायकोथेरपिस्ट)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button