भंडारा दुर्घटना : सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा- वंचित बहुजन आघाडी

पीडितांना १० लाखांची मदत द्या

Rajendra Patode

मुंबई : भंडाऱ्यातल्या जिल्हा रुग्णालयात शिशु केअर युनिटला लागलेल्या आगीत नवजात अर्भकांच्या झालेल्या मृत्युप्रकरणात दोषींविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचे अर्थसाहाय्य मंजूर करा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे. वंचितचे प्रवक्ते राजेंद्र पातोडे (Rajendra Patode) यांनी भंडारा घटनेचा शोक व्यक्त करत सरकारने प्रत्येक पीडित  कुटुंबाला १० लाखांचे  अर्थसाहाय्य करावे, अशी मागणी केली आहे. (Accuse the culprits in Bhandara incident of culpable homicide, help the victims with Rs 10 lakh Demand VBA) भंडाऱ्याच्या दुर्दैवी घटनेत ज्यांची नवजात मुले गेली त्या कुटुंबीयांच्या दु:खात वंचित बहुजन आघाडी सहभागी असून आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी नैतिक जबाबदारी घेत राजीनामा द्यावा, अशी मागणीदेखील वंचितने केली आहे.

या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या बालकांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून पाच लाख रुपये देण्यात येणार असल्याचेही जाहीर झाले आहे. ही मदत तोकडी असून कमीत कमी १० लाख रुपये प्रत्येक कुटुंबातील पालकांना देण्यात यावेत, अशी मागणी वंचितने केली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करताना दोषींवर कठोर करवाई केली जाईल व आगीच्या कारणांचा बोध घेऊन भविष्यात अशा घटना घडणार नाही याची दक्षता घेण्याची गरज आहे. शासकीय रुग्णालयाकडे सरकारचे लक्ष नाही.

भंडारा जिल्हा रुग्णालयातील एसएनसीयू वॉर्डमध्ये मध्यरात्री दीडच्या सुमारास आग लागली. शॉट सर्कीटमुळे आग लागल्याचा अंदाज प्रथमदर्शी  व्यक्त केला आहे. सखोल चौकशी करून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, असेही पातोडे म्हणाले. या दुर्घटनेत १० नवजात बालकांचा मृत्यू झाला असून त्यातील तिघांचा आगीत होरपळून तर अन्य सात बालकांचा धुराने गुदमरून मृत्यू झाला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER