भंडारा-गोंदिया पोटनिवडणूक : मधुकर कुकडे राष्ट्रवादीचे उमेदवार

भंडारा : राज्यात होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी झाली असून, येत्या २८ मे रोजी होणाऱ्या भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राच्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने माजी आमदार मधुकर कुकडे यांना उमेदवारी दिली आहे.

आज दुपारी ते आपले नामांकन दाखल करणार आहेत. राष्ट्रवादीचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल आणि काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष माजी खासदार नाना पटोले यांनी बुधवारला सायंकाळी त्यांच्या नावाची घोषणा केली होती.

यावेळी खा.प्रफुल्ल पटेल म्हणाले, माजी आमदार मधुकर कुकडे हे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाई आणि पिरीपा आघाडीचे संयुक्त उमेदवार असणार आहेत. त्यांच्या उमेदवारीचा निर्णय हा सर्वांची मते जाणून घेऊन घेण्यात आला आहे. नाना पटोले यांनी खासदारकीचा राजीनामा दिला होता.

तेव्हापासून ही जागा रिक्त होती. आता ही निवडणूक नाना पटोले आणि खा.प्रफुल्ल पटेल यांच्यासाठी अस्तित्त्वाची राहणार आहे. त्यामुळे ही निवडणूक जिंकण्यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने व्युहरचना आखली आहे.

दरम्यान उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मधुकर कुकडे हे आज दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात नामांकन दाखल करणार आहेत.