भंडारा जिल्हा रुग्णालय आग : सिव्हिल सर्जनसह ६ जण निलंबित

Bhandara District Hospital fire

मुंबई : देशाला हादरवून सोडणाऱ्या भंडारा जिल्हा रुग्णालयात (Bhandara District Hospital fire)लागेलेल्या आगीत १० नवजात बालकांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेला जबाबदार धरून सिव्हिल सर्जन डॉ. प्रमोद खंडाते, वैद्यकीय अधिकारी अर्चना मेश्राम यांना निलंबित करण्यात आले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. एकूण ७ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. (Major action in Bhandara District Hospital fire accident case)

हलगर्जीपणा

९ जानेवारी रोजी भंडारा जिल्हा रुग्णालयातील शिशू केअर युनिटला मध्यरात्री आग लागली. आगीत ८ मुली व २ मूल अशा १० नवजात बालकांचा मृत्यू झाला. ३ बालकांचा होरपळून तर ७ बालकांचा धुरामुळे गुदमरून मृत्यू झाला होता.

रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे ७ बालकांना वाचवण्यात यश आले होते. या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले होते. विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक चौकशी समिती नेमण्यात आली. या समितीने केलेल्या तपासात रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे आग लागल्याचे उघड झाले.

७ जणांवर कारवाई, ६ निलंबित

आरोग्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, भंडारा जिल्हा रुग्णालयाला लागलेल्या आगीच्या घटनेसंबंधीचा अहवाल काल उशिरा आरोग्य विभागाला मिळाला. ‘रेडियंट हिटर’मध्ये स्पार्क झाल्याने रात्री १ ते १. ३० च्या सुमारास आग लागली. ही जागा बंद होती व तिथे प्लास्टिक असल्याने आग पसरली.

या रुग्णालयाचे उद्घाटन २०१५ ला झाले होते. त्यावेळी रुग्णालयाचं फायर ऑडिट झाले नाही. आगीमागे ते ही कारण आहे. तिथे उपस्थित डॉक्टर आणि नर्सनी कामचुकारपणा केला, अशी माहिती टोपे यांनी दिली.

या प्रकरणात सिव्हिल सर्जन डॉ. प्रमोद खंडाते, वैद्यकीय अधिकारी अर्चना मेश्राम यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. डॉ. सुनिता बडे यांची तातडीने बदली करण्यात आली. सुशील अबाते यांना बडतर्फ करण्यात आले. नर्स ज्योती भास्कर, स्टाफ नर्स स्मिता आंबीददुलके आणि शुभांगी साठवणे यांना निलंबित करण्यात आले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER