रिफायनरीविषयी भूमिका मांडताना शिवसेना तालुकाप्रमुखांची भंबेरी

ShivSena Flags

रत्नागिरी/प्रतिनिधी :- ग्रीन रिफायनरी हा विषय सध्या शिवसेनेला चांगलाच गरम पडतो आहे. रिफायनरी प्रकल्पाला नेत्यांनी जोरदार विरोध केलेला असतानाच कार्यकर्ते मात्र बाजूने उभे राहिल्याने शिवसेनेत प्रकल्पावरून सुंदोपसुंदी माजली आहे. त्यामुळे प्रसारमाध्यमांसमोर सेनेची भूमिका मांडताना राजापूर शिवसेना तालुकाप्रमुख प्रकाश कुवळेकर यांची चांगलीच भंबेरी उडाली.

महिलांच्या प्रश्नांवरुन मनसेचा आदित्य यांना टोला

गेल्या काही दिवसांपासून रिफायनरी प्रकल्पावरुन सेनेत दुही माजली आहे. सागवे भागातील शिवसैनिक भूमिपुत्रांना साथ देत रिफायनरीची तळी उचलत असताना नेत्यांनी मात्र रिफायनरी रद्द किंवा कार्यकर्त्यांना दमदाटीची भाषा सुरू केली आहे. आताच्या घडीला राजापूर तालुक्यात शिवसेनेतील नेते व कार्यकर्ते परस्परांना भिडले आहेत. नवीन धोरणानुसार शिवसेनेकडून १ मार्चला प्रकल्प विरोधात सागव्यामध्ये जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. याची माहिती देण्यासाठी राजापूर शिवसेनेचे तालुका प्रमुख प्रकाश कुवळेकर यांनी सोमवारी पत्रकार परिषद आयोजित केली होती. या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर सेनेच्या तालुका प्रमुखांची चांगलीच दमछाक झाली. रिफायनरीची अधिसूचना रद्द झाली आहे त्यामुळे त्या प्रकल्पाचा मुद्दा संपला असे कुवळेकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

त्याचा आधार घेत जर सेनेच्या दृष्टीने रिफायनरीचा प्रश्न संपला असेल तर मग १ मार्चला सेनेला सागवेमध्ये सभा का घ्यावी लागतेय त्याचे कारण काय, सेनेचा अजूनही शासनाच्या त्या निर्णयावर विश्वास नाही का असे सवाल पत्रकारांनी करताच तालुकाप्रमुखांनी थातूर मातूर उत्तरे देऊन त्या प्रश्नांना सोयीस्कर बगल दिली. रत्नागिरीतील आमदार व मंत्र्यांचा यांचा राजापूर विधानसभा मतदार संघातील वाढता हस्तक्षेप आणि त्यातूनच आमदार राजन साळवींचे सुरु असलेले खच्चीकरण या विषयांवर विचारलेल्या प्रश्नांवर तालुकाप्रमुखांनी सरळ उत्तरे देण्याचे टाळले. नाणार प्रकल्पावरुन सुरूवातीला शिवसेना पक्षप्रमुख व विद्यमान मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, खासदार व आमदार यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीवर टीका करणारेच आता सेना नेत्यांच्या साथीला आले आहेत, ते संघटनेला चालते का, अशा अनेक प्रश्नांवर तालुकाप्रमुख चांगलेच गोंधळून गेले होते.