खून खटल्यातील आरोपी म्हणून भलत्यालाच अटक केल्याचे उघड

NHRC - Maharashtra Today
  • मानवी हक्क आयोगाचा सुटका व भरपाईचा आदेश

नवी दिल्ली : उत्तर प्रदेश पोलिसांनी खून खटल्यातील फरार आरोपी म्हणून एका भलत्याच व्यक्तीला अटक केली व ती व्यक्ती गेली सुमारे पाच वर्षे निष्कारण तुरुंगात आहे, अशी धक्कादायक माहिती तपासातून समोर आल्यानंतर राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाने (NHRC) त्या व्यक्तीला सन्मानाने सोडून देण्याचा आदेश उत्तर प्रदेश सरकारला दिला आहे.

आझमगढ पोलिसांना ज्याला अटक करायची होती त्याचे नाव जुलूम शर्मा असे होते. पोलिसांनी न्यायालयाकडून त्याच नावाचे अजामीनपात्र अटक वॉरन्टही घेतले होते. पण प्रत्यक्षात त्यांनी सिंगासन विश्वकर्मा या व्यक्तीला अटक केली. विशेष म्हणजे न्यायालयानेही कोणताही शहानिशा न करता समोर आणलेला आरोपी जुलूम शर्मा हाच आहे या पोलिसांच्या सांगण्यावर विश्वास ठेवून विश्वकर्मा याची कोठडीत रवानगी केली. गेली पाच वर्षे तो जामिनाविना तुरुंगात आहे.

विश्वकर्माने या प्रकरणी मानवी हक्क आयोगाकडे तक्रार केली. आयोगाने उत्तर प्रदेश सरकारला नोटीस पाठवली. परंतु त्यांच्याकडून ोकणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे आयोगाने आपल्या तपासी शाखेकरवी या प्रकरणी स्वत: तपास केला. त्यातून विश्वकर्मा याची तक्रार खरी असल्याचे निष्पन्न झाले.

त्यामुळे विश्वकर्मा याला सन्मानाने सोडून  देण्याचा व त्याच्या मानवी हक्कांची पायमल्ली केल्याबद्दल त्याला तीन लाख रुपये भरपाई देण्याचा आदेश आयोगाने उत्तर प्रदेश सरकारला दिला. तसेच चुकीच्या व्यक्तीला आरोपी म्हणून अटक करण्याच्या निष्काळजीपणास कोण पोलीस अधिकारी जबाबदार आहेत हे निश्चित करून त्यांच्यावर कारवाई करण्याचा आदेशही राज्याच्या पोलीस महासंचालकांना दिला गेला.

तसेच या प्रकरणात संबंधित न्यायाधीशाने कर्तव्यात कुचराई केल्याने त्यांच्यावर सुयोग्य कारवाईसाठी आयोगाने या प्रकरणाचे सर्व रेकॉर्ड अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांकडेही पाठविले. या प्रकरणात आझमगढ पोलिसांनी सन २००० मध्ये भादंवि कलम १४७, १४८, १४९, ३०२, ५०६ व ३४ या कलमान्वये एकूण पाच आरोपींविरुद्ध ‘एफआयआर’ नोंदविला होता. त्यापैकी चार आरोपींना पोलिसांनी अटक केली व जुलूम शर्मा हा पाचवा आरोपी फरार असल्याचे दाखविले गेले. अटक केलेल्या चार आरोपींवर खटला चालला व न्यायालयाने त्यांना निर्दोष मुक्त केले. त्यानंतर १३ वर्षांनी पोलिसांनी फरार आरोपी जुलूम शर्मा याला अटक करण्यासाठी त्याच्या नावाचे अटक वॉरन्ट घेतले, पण प्रत्यक्षात सिंगासन विश्वकर्मा या भलत्याच व्यक्तीला अटक केली.

अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button