मुंबईचा महापौर काँग्रेसचाच होईल; भाई जगतापांनी दिला स्वबळाचा नारा

Bhai Jagtap.jpg

मुंबई : काँग्रेस (Congress) स्थापनादिनानिमित्त आज मुंबई काँग्रेसचे नवनियुक्त अध्यक्ष भाई जगताप (Bhai Jagtap) यांनी यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये झालेल्या कार्यक्रमात पदभार स्वीकारला. यावेळी मंचावर उपस्थित सर्वच नेत्यांनी मुंबई महापालिकेसाठी स्वबळाची भाषा केली आहे. सुरुवातीला मुंबईचे अध्यक्ष भाई जगताप यांनी मुंबईत स्वबळावर लढू द्या, अशी मागणी मंचावर उपस्थित नेत्यांकडून केली. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण यांनीही मुंबई महापालिकेसाठी स्वबळावर लढण्याचा इरादा बोलून दाखवला.

भविष्यात राष्ट्रीय नेतृत्व वेगळा निर्णय घेतल्यास आम्हाला ते ऐकावे लागेल, पण तरीही आम्ही सर्व २२७ जागा लढवण्यास तयार आहोत, असे जगताप म्हणाले. माझी नियुक्ती ही एका वर्षासाठी नाही, तर पाच वर्षांसाठी झाली आहे. या कार्यकाळातील सर्वात पहिलं मोठं आव्हान हे मुंबई महापालिका निवडणूक आहे. येत्या वर्षभरात आम्ही सर्व कार्यकर्त्यांना हाताशी धरुन मोठ्या प्रमाणात काम करु. जेणेकरुन महापालिका निवडणुकीचे हे आव्हान आम्हाला यशस्वीरित्या पेलता येईल, असे भाई जगताप यावेळी म्हणाले.

गेल्या १५ वर्षांपासून आम्ही आघाडी सरकारमध्ये होतो. काँग्रेस, राष्ट्रवादी, समाजवादी पक्ष आणि काही इतर पक्ष अशी आमची आघाडी होतीच. मात्र १५ वर्षांमध्ये तीनही वेळा आम्ही २२७ जागा लढवल्याच. त्यामुळे आता महाविकास आघाडीमध्येही आम्ही २२७ जागाच लढवणार आहोत. ही माझी एकट्याचीच नाही, तर पक्षातील सर्व कार्यकर्त्यांची मागणी आहे.

काँग्रेसचा महापौर होईल का? असे विचारले असता, कार्यकर्त्यांनी मुंबईचा महापौर होण्याची आशा बाळगणं यात काहीही गैर नाही. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी कोरोना काळात जेवढं काम केलं आहे, जेवढी मेहनत केली आहे ती पाहता त्यांची ही आशा सत्यात उतरेल असा मलाही विश्वास वाटतो, असे मत भाई जगताप यांनी व्यक्त केले.

मुंबईमध्ये काँग्रेसचा महापौर जरी झाला, तरी याचा राज्य सरकारवर काही परिणाम होणार नाही. मी केवळ मुंबईपुरता विचार करतो आहे, आणि प्रत्येक पक्षाला आपला विस्तार करायचा हक्क आहेच. त्यामुळे यामुळे राज्य सरकारवर काही परिणाम होईल असे वाटत नसल्याचे भाई जगताप यांनी स्पष्ट केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER