‘पंढरपुरात भगीरथ भालकेच विजयी होणार !’ जयंत पाटलांचा दावा

jayant patil - Bhagirath Bhalke - Maharastra Today

पंढरपूर : पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भगीरथ भालके विजयी होणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे, असा ठाम विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केला. आज राज्यावर कोरोनाचं मोठं संकट  आहे. राज्यात तीन पक्षांचे सरकार आहे. आम्ही तिघेही एकजुटीने या संकटाशी लढा देत आहोत. या मतदारसंघातही आम्ही एकदिलाने लढतो आहे. त्यामुळे भगीरथचा विजय ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे, असे जयंत पाटील यांनी सांगितले. पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीचे महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) अधिकृत उमेदवार भगीरथ भारत भालके (Bharat Bhalke) यांच्या प्रचाराचा रांजणीतून शुभारंभ करण्यात आला. भगीरथ भालके यांना विजयी करण्यासाठी संपूर्ण मतदारसंघ मेहनत घेत आहे.

रात्रीचा दिवस करून राष्ट्रवादी काँग्रेस हा विजय मिळवेल अशी खात्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी व्यक्त केली. यावेळी जयंत पाटील म्हणाले की, आज भाजपने इथे उमेदवार दिला आहे. भारतनाना भालके विरोधी पक्षाचे आमदार होते तेव्हा भाजप सरकारने या मतदारसंघाकडे मुद्दामपणे दुर्लक्ष केले होते. ३५ गावांचा प्रश्न असेल किंवा मतदारसंघातील इतर प्रश्न असतील, नानांनी प्रत्येक वेळी भाजपशी संघर्ष केला याची आठवणही जयंत पाटील यांनी करून दिली. आपलं सरकार आहे म्हणून गुजरातमधील सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियमला त्यांनी स्वतःचं नाव दिलं. बांग्लादेश स्वातंत्र्याचे संपूर्ण श्रेय इंदिरा गांधींचे आहे, तिथेही आपण बांग्लादेश स्वतंत्र लढ्यात होतो असं सांगत आहेत.

मागचा इतिहास पुसून आपण सर्वांत  श्रेष्ठ आहोत, हे सतत सांगण्याचा प्रयत्न काहींकडून केला जात आहे. देशभरात पेट्रोल-डिझेलचे भाव वाढले आहेत, शेतकरी बांधव दिल्लीत आंदोलनाला बसले आहेत. मात्र, देवेंद्र फडणवीस यांच्या नेत्याला यावर बोलण्यास वेळ नाही. आज नोकरदारांच्या नोकऱ्या सुरक्षित नाहीत, तरुणांच्या हाताला काम देण्याची सरकारकडे कुवत तर नाहीच; पण आहे त्या नोकरीवरही मोदी सरकारने टांगती तलवार ठेवली आहे, अशी जोरदार टीकाही जयंत पाटील यांनी केली. महाराष्ट्र सरकार कसं संकटात सापडेल यासाठी भाजप प्रयत्न करत आहे. काही घटनांचा तपास आमच्या हातात जर असता तर तत्काळ या घटनांमागे कोण आहे हे शोधून काढले असते.

मात्र, तपास एनआयएकडे आहे. हा तपास संथगतीने सुरू आहे का, असा प्रश्न आता पडला आहे. या प्रकरणाचा तपास लवकरात लवकर लागावा, अशी मागणीही जयंत पाटील यांनी केली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीचे सरकार अशा  कोणत्याही प्रकरणाच्या जाळ्यात अडकणार नाही, याची खात्रीही जयंत पाटील यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button