वयाच्या १९ व्या वर्षी फासावर गेलेला सिंध प्रांताचा भगतसिंग !

Maharashtra Today

लहानपणी हातात तिरंगा घेऊन देशप्रेमाची गाणी गुणगुणत युवकायुवकांमध्ये देशप्रेमाची अग्नि पेटवणाऱ्या युवकाचे हे बोल होते. ..

कौमी झंडा फहराए फर फर,
दुश्मन का सीना कांपे थर थर!!
आया विजय का ज़माना, चलो शेर जवानों!!

कळतं वय आलं तर त्याला भगतसिंग (Bhagat Singh) व्हायचं होतं हे कळालं. क्रांतीच्या वाटेवर चालून देशासाठी प्राण त्यागायची त्यांनं तयारी केली होती. पुढं जाऊन तो बालक ‘हेमू कलानी’ (Hemu Kalani) बनला ज्यांचं नाव आजही सिंधचा भगतसिंग म्हणून आदरपुर्वक घेतलं जातं. इंग्रजांनी हेमु कलानी यांना वयाच्या १९ व्या वर्षी फासावर चढवलं.

सुरुवातीचा काळ

सिंधच्या सक्खरमध्ये २३ मार्च १९२३ साली पेसूमल कलानी यांच्या घरी मुलानं जन्म घेतला. नाव ठेवण्यात आलं, हेमु कलानी, आईच नाव होतं जेठीबाई. त्यांचे वडील सन्मानित व्यक्ती होते. त्यांची विट भट्टी होती. इंग्रज अधिकारीसुद्धा त्यांच्यासोबत आदबीनं वागत. हेमू यांच्या परिवारात देशभक्त लोक होते. लहानपणापासून क्रांतीकाऱ्यांचे किस्से ऐकत ते मोठे झाले होते. लहानपणापासून त्यांच्या मनात राष्ट्रासाठी बलिदान देण्याची भावना होती. लहानपणापासून ते अत्यंत हुशार आणि धाडसी स्वभावाचे होते.

पाच वर्षाच्या प्राथमिक शिक्षणानंतर हेमू कलानी यांनी पूढील शिक्षण टिळक हायस्कूल येथून घेतले. तिथेच त्यांनी राष्ट्रप्रेमाची दिक्षा घेतली. डॉ. मेघाराम कलानी यांनी, कराची येथे ‘स्वराज्य मंडळ’ नावाची संस्था स्थापन केली. य संस्थेमार्फत तरूणांनी ‘स्वराज्य सेना’ सक्करमध्ये उभारली. या संघटनेचे नेतृत्व हेमू कलानी यांच्या कडे होते. आपल्या शाळेतील मित्रांना एकत्र करून हिंदुस्थानच्या स्वातंन्त्र्य लढ्यात सामील होण्याची शपथ घेतली. लहानपणापासून हेमु कलानी धाडसी होते. त्यांच्या काकांसोबत त्यांनी कुस्तीचे धडे गिरवले होते. या सोबतच खो-खो, कबड्डी, फुटबॉल हे खेळ त्यांच्या आवडतीचे होते.

बंदूक घेऊन घराबाहेर पडले

लहानपणापासूनच हेमू यांच्या स्वभाव निडर होता. त्यांच्या भितीने लोक घराची, दुकानांची दारं बंद करुन घ्यायची. छातीठोकपणे इंग्रज अधिकाऱ्यांसमोर ते रुबाबात वावरत. त्यांनी देशभक्तीने भरलेल्या अनेक गीतांच लेखनं केलं होतं. एकदा त्यांच्या वडीलांना इंग्रजांनी अटक केली तेव्हा घरातली बंदूक कंबलेला लावून साथीदारांसह वडीलांना सोडवायला घराबाहेर पडले. यानंतर त्यांना संघटनेची ताकद कळाली त्यांनी ‘स्वराज्य सेना मंडळ’ या संघटनेची स्थापना केली.

रेल्वे मार्ग उडवण्याचा प्रयत्न

२३ ऑक्टोबर १९४२ रोजी लष्करी सैन्य घेऊन रेल्वेगाडी उडविण्याची योजना केली. योजनेपणे हेमू व त्याच्या मित्रांनी रेल्वे रूळाच्या फिश प्लेट्स काढण्यास सुरवात केली. एवढ्यात संरक्षक पथकातील सैनीक तेथे आले. हेमुने सर्व साथिदारांना दरडावून पळून जाण्यास सांगितले. हेमू कलानी एकटे पोलिसांच्या ताब्यात सापडले. लष्करी कोर्टापूढे त्यांना आणले. त्यांचा अनन्वित छळ करूनही त्यांनी आपल्या साथिदारांची नावे ब्रिटिशांना सांगितली नाहीत. लष्करी कोर्टात त्यांनी एकच उत्तर दिले, “गुलामी आणि दडपशाही यांचा प्रतिकार करण्याचा मला जन्मसिद्ध हक्क आहे. त्यासाठी मी जे काही केले याचा मला खेद वाटत नाही. लष्कराची गाडी पाडण्यात मला अपयश आल्याने दुःख होत आहे. ”

१९ व्या वर्षी फाशी

हेमू यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. तेव्हा लोकांच्या डोळ्यात अश्रू दिसत होते आणि हेमूंच्या नजरेत वेगळीच चमक. लहानपणापासून त्यांनी भगतसिंगांच्या वाटेवर जायचं होतं. देशाच्या स्वातंत्र्यासाठी आनंदानं फाशी घ्यायची त्यांची तयारी होती. त्यांच बलिदानाचं स्वप्न साकार होणार होतं. इंग्रजांच्या या निर्णयाविरोधात हेमू यांना मानणारा मोठा वर्ग प्रदर्शन करु लागला. इंग्रजांनी लोकांच्या विरोधाला जुमानलं नाही. हेमू यांच्या वाढदिवसादिवशीच भगतसिंग यांना फाशी झाली होती आणि हेमू यांना देखील त्याच दिवशी २३ मार्च १९४३ साली फाशीची शिक्षा झाली. त्यांच्या मृत्यूनंतर केवळ सिंध प्रांतात नाही तर देशभरात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. त्यांच्या अंत्ययात्रेत हजारो लोक सामील झाले होते. हेमू यांनी पराक्रमानं आणि बलिदानानं पेटवलेली स्वातंत्र्याच्या मशालीनं न जाणे कित्येक स्वातंत्र्यवीरांची मनं प्रज्वलित झाली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button