दिलीप यांनी कोरोनाशी दिला ६५ दिवस लढा; बरे होऊन घरी आले

Best Bus

मुंबई : बेस्टचे चालक दिलीप पैकाडे (५५) यांनी कोरोनाशी ६५ दिवस लढा देऊन त्यावर मात केली. भांडुप येथे राहणारे दिलीप गोरेगाव येथील माजस डेपोत काम करतात. टाळेबंदीच्या काळात अत्यावश्यक सेवेत चालक म्हणून कामावर होते. मास्क बांधून आणि मोजे घालून पूर्ण ८ तास काम करायचे. २० जून रोजी त्यांना ताप आणि अंगदुखीचा त्रास जाणवला. कोरोनाची शंका आल्याने मुलुंडच्या सरकारी रुग्णालयात चाचणी करून घेतली. चाचणी पॉझेटिव्ह आली. त्यांना श्वाशोत्श्वास करण्यास त्रास होऊ लागला.

दिलीप यांचा मुलगा दिल्ली येथे मेडिसिनचे शिक्षण घेतो आहे. दिलीप यांनी त्याला ही माहिती दिली. त्याच्या सल्ल्याने दिलीप यांना कोरोनासाठीच्या अंधेरी येथील सेव्हन हिल्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. आजारपणाचा अनुभव सांगताना दिलीप म्हणाले – माझा श्वाशोत्श्वास थांबल्यासारखा झाला होता. शुद्ध नव्हती. फक्त एवढेच आठवते की, डॉक्टर म्हणाले – केस गंभीर आहे. मला लगेच व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. १७ दिवस व्हेंटिलेटरवर होतो.

दिलीप आजारी असताना त्यांच्या पत्नीलाही कोरोनाची लागण झाली. त्यांना विलगीकरण केंद्रात ठेवले होते. त्या बऱ्या झाल्या. त्यावेळी खूप एकटेपणा जाणवायचा. कठीण काळ होता. माझ्या कुटुंबाने मला खूप धीर दिला. मुलाने भीतीतून बाहेर काढले, असे ते म्हणतात. बेस्टचे अधिकारी दिलीप यांच्या कोरोनातून बरे होण्याची तारीफ करतात. त्यांच्यामुळे बेस्टच्या इतर कर्मचाऱ्यांना कोरोनाशी लढण्याचा धीर आला, असे म्हणतात.

६५ दिवस दवाखान्यात राहिल्यानंतर दिलीप आता घरी आले आहेत. अजून पूर्ण बरे झाले नाहीत. काही दिवस आराम करून पुन्हा कामावर जायचे की नाही, याचा निर्णय घेणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER