तुम्हाला ठाऊक आहे का, क्रीडा इतिहासातील सर्वोत्तम 45 मिनिटे कोणती?

Best 45 minutes in sports

अमेरिकन धावपटू जेस्सी ओवेन्स यांच्या 1936 च्या बर्लिन ऑलिम्पिकमधील चार सुवर्णपदकांची आणि या कामगिरीसह हुकुमशहा हिटलरला त्याने दिलेल्या करारी उत्तराची नेहमीच आठवण केली जाते पण खूप कमी लोकांना याची माहिती आहे की याच्या एक वर्ष आधी 25 मे 1935 रोजी जेस्सी ओवेन्स यांनी अशी कामगिरी केली होती की ‘स्पोर्टस् इलुस्ट्रेटेड’ ने त्याची क्रीडा इतिहासातील सर्वोत्तम 45 मिनिटे अशी नोंद केली होती. या दिवशी ओवेन्स यांनी विश्वविक्रमांचा असा धमाका केला होता की त्यावर विश्वास ठेवणे अवघड जावे.

मिशीगन प्रांतातील ऍन आर्बोर येथे ओवेन्स यांनी तो विश्वविक्रमांचा धडाका केला होता. त्यावेळी त्यांनी 45 मिनिटात एक-दोन नव्हे तर तब्बल सहा विश्वविक्रम केले होते. यात 200 मीटर आणि 200 मी. हर्डल्समधील प्रत्येकी दोन विश्वविक्रम होते. त्यावेळी बिग टेन कॉन्फरन्स चॅम्पियनशीपध्ये ओहियो स्टेट युनिव्हर्सिटीचे ते प्रतिनिधित्व करत होते. त्यावेळी त्यांनी 100 यार्डच्या शर्यतीत 9.4 सेकंदाची त्यावेळच्या विश्वविक्रमाची बरोबरी करणारी वेळ दिली होती आणि लांब उडीत 8.13 मीटरचे अंतर कापून ते आठ मीटरपेक्षा अधिक लांब उडी मारणारे ते पहिले खेळाडू ठरले होते.

त्यादिवशी ओवेन्स यांचा विश्वविक्रमाचा धडाका दुपारी 3.15 वा.सुरु झाला आणि क्रमाक्रमाने त्यांनी पुढच्या 45 मिनिटात कसे विश्वविक्रम केले ते बघा…

दु. 3.15 वा.- 100 यार्ड- 9.4 सेकंद
दु. 3.25 वा.- लांब उडी- 8.13 मीटर
दु. 15.45 वा. – 200 मीटर (220 यार्ड)- 20.3 सेकंद
दु. 4 वा.- 200 मी.हर्डल्स (220 यार्ड हर्डल्स)- 22.6 सेकंद

त्यांचा लांब उडीचा विश्वविक्रम 1960 पर्यंत कायम राहिला. मात्र तोपर्यंत ओवेन्स यांच्या या 8.13 मीटरच्या लांब उडीची मोठ्या अविश्वासाने आणि आश्चर्याने चर्चा होत राहीली.

या विश्वविक्रमांच्या वेळी ओवेन्स यांनी ओहियो युनिव्हर्सिटीचे प्रतिनिधित्व करणारी लाल रंगाची व्हेस्ट (बनियान) घातलेली होती. 2 डिसेंबर 2018 रोजी ओवेन्स यांचे नातू स्ट्युअर्ट रँन्कीन यांनी जागतिक अॕथलेटिक्स संघटनेच्या (आयएएएफ) हेरिटेज लिजेंडस् नाईट कार्यक्रमात आयएएएफच्या हेरिटेज संग्रहासाठी भेट दिली.

2019 मध्ये त्यांची ही व्हेस्ट दोहा येथील विश्व अजिंक्यपद ऍथलेटिक्स स्पर्धेच्या आधी मांडण्यात आली होती. पुढच्या वर्षी टोकियो ऑलिम्पिकच्या वेळीसुध्दा वर्ल्ड ऍथलेटिक्स हेरिटेज प्रदर्शनात ती मांडण्यात येणार आहे. त्यानंतर 2022 मध्ये पुन्हा जागतिक अजिंक्यपद स्पर्धेवेळी ती युजीन, ओरेगाॕन येथे मांडण्यात येणार आहे.

गंमत म्हणजे जेस्सी ओवेन्स हे एवढे महान आणि सफल ऍथलीट राहिले असले तरी त्यांच्या घरी, त्यांच्या कुटुंबात त्यांच्या त्या महान यशाची क्वचितच चर्चा व्हायची असे त्यांचे नातू स्ट्युअर्ट रँन्कीन सांगतात. गंमत म्हणजे 1935 मधील ऍन आर्बोर येथील त्यांच्या या कामगिरीची रँन्किन यांना कितीतरी वर्षे माहितीच नव्हती. वस्तुस्थिती अशी आहे की ओवेन्स यांच्या निधनानंतरच त्यांना ही कामगिरी समजली. त्यांच्या मरणोत्तर त्यांच्या सन्मानार्थ मिशिगन विद्यापीठात आयोजित एका कार्यक्रमात या ऐतिहासिक 45 मिनिटांच्या कामगिरीची माहिती आम्हाला मिळाली. ती समजल्यावर मला आजोबांबद्दल असालेला आदर, सन्मान, अभिमान,अधिकच वाढला आणि स्पोर्टस् इलुस्ट्रेटेडसारखे प्रतिष्ठित नियतकालिक त्यांच्या या कामगिरीचे ‘क्रीडा इतिहासातील सर्वोत्तम 45 मिनिटे’ असे वर्णन करते हे समजल्यावर तर अभिमानाने माझी छाती अधिकच फूलली असे स्ट्युअर्ट रँन्किन यांनी म्हटले आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER