उर्वरीत आयुष्यभर मला खेद राहिल : बेन स्टोक्स

विश्वचषक अंतिम सामन्यातील ओव्हर थ्रो बद्दल भावना

Ben Stokes

लंडन :- विश्वचषक अंतिम सामन्यात फलंदाज बेन स्टोक्सच्या बॅटीला चेंडू लागून झालेल्या ओव्हर थ्रोच्या इंग्लंडला मिळालेल्या पाच ऐवजी सहा धावा या एका चुकीने न्यूझीलंडला विश्वविजेतेपदापासून वंचित ठेवल्याची क्रिकेट वर्तुळात जोरदार चर्चा आहे. त्यासंदर्भात इंग्लंडचा संबंधित फलंदाज बेन स्टोक्स याने आपल्याला आयुष्यभरासाठी या घटनेचा खेद राहिल असे म्हटले आहे. सामन्यादरम्यानसुद्धा हे ओव्हर थ्रो नाट्य घडले त्यावेळीसुद्धा बेन दोन्ही हात उंचावून या प्रकाराबद्दल खेद व्यक्त करताना दिसला होता.

सामन्यात तीनच चेंडू शिल्लक असताना ट्रेंट बोल्टचा तो चेंडू बेन स्टोक्सने डीप मिडविकेटकडे फटकावल्यावर मैदानातून खोलवरुन मार्टीन गुप्तीलने थ्रो केला पण धाव घेण्यासाठी धावणाºया आणि धावबाद होण्यापासून वाचण्यासाठी क्रीझकडे झेपावलेल्या स्टोक्सच्या बॅटीला चेंडू लागून त्याची दिशा बदलली आणि जो डायरेक्ट थ्रो होणार होता त्याऐवजी तो चेंडू थेट सीमापार झाला आणि या गोंधळात फलंदांजांनी काढलेल्या दोन धावा अधिक ओव्हर थ्रोच्या चार धावा अशा एकूण सहा धावा पंचांंनी इंग्लंडला बहाल केल्या पण मुळात हा निर्णय चुकीचा होता कारण गुप्तीलने ज्यावेळी चेंडू थ्रो केला त्यावेळी फलंदाज स्टोक्स व आदिल रशिद हे दुसरी धाव घेण्यासाठी फक्त वळले होते, त्यांनी एकमेकाला ओलांडलेले नव्हते त्यामुळे दुसरी धाव अवैध होती. या सहा धावा मिळाल्याने इंग्लंडचे लक्ष दोन चेंडूत तीनच धावा असे बदलले आणि त्यांनी पुढे हा सामना टाय केला आणि सुपर ओव्हरमध्येही सामना टायच राहिल्यावर बाऊंडरी काउंटबॅक नियमाने इंग्लंडला विश्वविजेतेपद मिळवून दिले.

या घटनेबद्दल स्टोक्स म्हणाला की, मी अशा पद्धतीने खेळू इच्छितच नव्हतो. चेंडू माझ्या बॅटीला अपघातानेच लागून गेला. या प्रकाराबद्दल मी केनची माफीसुद्धा मागितली. मी केनला म्हणालो की मी आयुष्यभर या प्रकारासाठी दिलगीर राहिन.

बेन स्टोक्सच्या या खेळाडूवृत्तीचे न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्मसननेही कौतुक केले आणि त्या घटनेबद्दल तो म्हणाला की, हा काही चांगला प्रकार नव्हता. अशा आणिबाणीच्या प्रसंगांवेळी असे घडू नये एवढीच आशा तुम्ही करू शकता.

दुसरीकडे, पंचांनी यावेळी सहा ऐवजी नियमानुसार पाचच धावा दिल्या असत्या तर सामना टाय होण्याचा प्रश्नच नव्हता, उलट न्यूझीलंडने एका धावेने सामना जिंकला असता असे माजी पंच व क्रिकेटचे जाणकार म्हणत आहेत.

क्रिकेटच्या नियम १९.८ नुसार ओव्हरथ्रोच्या वेळी चौकाराशिवाय निघालेल्या धावा मिळतील पण धाव पूर्ण झालेली असली पाहिजे आणि थ्रो करतेवेळी फलंदाजांनी एकमेकाला ओलांडलेले असले पाहिजे तरच ती धाव ग्राह्य धरण्यात येईल असे म्हटले आहे. मात्र प्रत्यक्षात स्टोक्स व रशिद हे गुप्तीलच्या थ्रो वेळी दुसरी धाव घेताना एकमेकांना ओलांडून गेलेलेच नव्हते. त्यामुळे पंच मरायस एरास्मस व कुमार धर्मसेना यांचा इंग्लंडला सहा धावा देण्याचा निर्णय चुकीचाच होता हे आता स्पष्ट झाले आहे.

केवळ धावच नाही तर ही चूक वेळीच लक्षात आली असती तर पुढच्या चेंडूला स्ट्राईक रशिदकडे आली असती. पण तसेही घडले नाही.

माजी अनुभवी पंच सायमन टोफेल यांनी सहा धावांचा हा निर्णय चुकीचाच असल्याचेच म्हटले आहे. मात्र यात धाव घेणारे फलंदाज बघायचे की थ्रो करणारा क्षेत्ररक्षक एकाच वेळी बघायचा हे फार अवघड असते असे टोफेल यांनी म्हटले आहे. टोफेल यांनी १७४ वन डे, ७४ कसोटी आणि ३४ टी-२० आंतरराष्टÑीय सामन्यांमध्ये पंचगिरी केली आहे.