मराठी बांधवांसाठी संजय राऊतांची विनंती गडकरींकडून मान्य, बेळगावची प्रचारसभा रद्द

बेळगाव :- बेळगावातील (Belgaum) मराठी बांधवांची अस्मिता जपण्यासाठी सर्वानी राजकारण बाजूला सारून एकत्र यावे, त्यांना मदत करता येत नसेल तर किमान मराठी मतदारांमध्ये फूट तरी पाडू नका, या संजय राऊत यांच्या आवाहनाला भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी पाठिंबा दिला आहे. गडकरींनी बेळगाव येथील नियोजित प्रचारसभा रद्द केल्याची माहिती पुढे येत आहे. याची अधिकृत घोषणा झाली नसली तरी गडकरींचा दौरा रद्द झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र, त्याऐवजी आता राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे आज बेळगावात भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे आता संजय राऊत (Sanjay Raut) यावर काय प्रतिक्रिया देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

भाजपकडून सुरेश अंगडी यांच्या पत्नी मंगला अंगडी, तर कॉंग्रेसतर्फे आमदार सतीश जारकीहोळी रिंगणात उतरले आहेत. शिवसेनेतर्फे के. पी. पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र मराठी मतांची होणारी फूट टाळण्यासाठी त्यांनी उमेदवारी मागे घेतली. त्यानंतर शिवसेनेने महाराष्ट्र एकीकरण समितीला पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे बेळगाव पोटनिवडणुकीची लढत चुरशीची झाली आहे.

ही बातमी पण वाचा : नितीन गडकरी मराठी माणसांना खाली पाडण्यासाठी भाजपचा प्रचार करतील का?; संजय राऊतांचा सवाल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button