फडणवीसांना दुहेरी जबाबदारी; बेळगाव पोटनिवडणुकीसाठी स्टार प्रचारक

Devendra Fadnavis

बेळगाव : महाराष्ट्रात विरोधी पक्षनेते म्हणून चांगली कामगिरी बजावणारे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने दुसरी जबाबदारी सोपवली आहे. सलग चार वेळा बेळगावचे खासदार राहिलेले केंद्रीय मंत्री सुरेश अंगडी (Suresh Angadi) यांचं अकाली निधन झाल्यानंतर बेळगाव लोकसभा पोटनिवडणूक (Belgaum by-election) होत आहे. येत्या १७ एप्रिल रोजी बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार असून २ मे या दिवशी या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.

दरम्यान या निवडणुकीत देवेंद्र फडणवीस बेळगावात प्रचार करताना दिसण्याची दाट शक्यता आहे. भाजपच्या स्टार प्रचारकांच्या यादीत देवेंद्र फडणवीसांना स्थान देण्यात आले आहे. विशेष म्हणजे या यादीमध्ये असणारे हे एकमेव मराठी नाव असल्याचीही माहिती सूत्रांकडून मिळत आहे. मात्र देवेंद्र फडणवीसांनी बेळगावामध्ये प्रचाराला येऊ नये, अशी भूमिका काहींनी घेतली आहे. मराठी भाषिक आणि महाराष्ट्र एकीकरण समितीची अशी भूमिका आहे. भारतीय जनता पार्टीने या निवडणुकीसाठी सुरेश अंगडी यांच्या पत्नी मंगला अंगडी यांना उमेदवारी दिली आहे. तर काँग्रेसतर्फे सतीश जारकीहोळी रिंगणात आहेत.

महाराष्ट्र एकीकरण समितीकडून शुभम शेळके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मतांची विभागणी टाळण्यासाठी शिवसेनेचे के. पी. पाटील यांनी उमेदवारी अर्ज मागे घेत महाराष्ट्र एकीकरण समितीला पाठिंबा दिला आहे. यामुळे बेळगाव मतदारसंघात तिरंगी लढत पाहायला मिळेल. त्यामुळे येणाऱ्या पोटनिवडणुकीत नेमकं काय होणार याकडे दक्षिण महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटकचंही लक्ष असणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button