ढेकर – तृप्ततेची की विकाराची ?

Burp

जेवण झाल्यावर ढेकर आली की आपण म्हणतो वा मस्त जेवण झालं किंवा तृप्त झालं आज असे एक ढेकर देत लोकं म्हणतात. आजकाल ढेकर येणं ही जरा लाजीरवाणी गोष्ट वाटते. पण ढेकर हे आरोग्य वा अनारोग्याचे लक्षण असू शकते हे आपल्याला माहिती आहे का ?

आयुर्वेदात यालाच उद्गार असे म्हणतात. उद्गार येणे हे वायुचे काम आहे. मल मूत्र शिंक जांभई इ. नैसगिक वेग जसे अडकवू नये किंवा थांबवू नये असे आपण सांगतो तसेच आयुर्वेदात ढेकर किंवा उद्गार येत असेल तर ते अडकवू नये असे सुद्धा सांगितले आहे. उद्गार वरच्या मार्गाने ( मुख मार्गाने) वायुचे निस्सरण करते त्यामुळे ते थांबविल्यास उचकी, दम लागणे, हृदय वा छातीमधे जकडल्याप्रमाणे वेदना अशा तक्रारी निर्माण होतात. कधीतरी हा अनुभव बऱ्याच जणांनी घेतला असेल गॅसेस झाले की छातीवर दाब निर्माण होतो श्वास लागतो किंवा छाती दुखते. हृदयाचे विकार असल्या प्रमाणे ही लक्षणे जाणवतात पण एक ढेकर निघाली किंवा गॅसेस कमी झाली की आपोआप बरे वाटते. इतका मोठा परिणाम या उद्गार (ढेकर) अडकविण्याचा होऊ शकतो. म्हणूनच उद्गार वेग कधीच रोखू नये.

आयुर्वेदात अन्न पचले की नाही हे कसे ओळखावे याचे वर्णन करतांना सांगितले आहे की पोट हलके वाटणे, ढेकर शुद्ध असणे म्हणजेच त्याला घेतलेल्या अन्नाचा किंवा कडू आंबट वास नसणे इ.

अन्न पचले नसेल किंवा जड जेवण झाल्यानंतर लगेच झोप घेतली असेल तर आहाराच्या उद्गार येतात तोंडाला पाणी सुटते. शरीर जड वाटते. म्हणजेच अन्न पचलेच नाही म्हणून अन्नाचे ढेकर येतात.

कधी कधी पित्त वाढून आंबट ढेकर येतात यामुळे छातीत जळजळ वारंवार पाणी प्यावेसे वाटणे हे वैकारीक उद्गार.पाचन नीट झाले नाही किंवा पोट साफ झाले तर करपट कडू उद्गार येतात.

आंबट कडू अन्नाचे मलगंध उष्ण रक्तगंध उद्गार किंवा ढेकर येणे हे दोष विकृती दाखविणारे आहे. त्यामुळे जंत होणे, अजीर्ण, अम्लपित्त, पोटात वायू धरणे, मूळव्याध तसेच ग्रहणीविकार, रक्तपित्त अशा अनेक व्याधींचे हे लक्षण असू शकते. वांती होण्यापूर्वी सुद्धा ढेकर येण्याचे प्रमाण वाढते व नंतर वांती होते.

लहान बाळांना दूध पाजल्यानंतर कडेवर घेऊन ढेकर काढावी असे सांगितले जाते. ज्यायोगे दूध बाहेर पडत नाही व वायुमुळे पोट फुगत नाही.

अनेक जणांना जास्त प्रमाणात ढेकर येतात. हातावर दाबले तरी ढेकर येतात. आवाज पण जास्त असतो. विकृत वासाचे ढेकर ; यावर उपाय काय तर आहारावर नियंत्रण. अन्नाचे ढेकर येणे म्हणजे अजीर्ण झालेय मग लंघन किंवा गरम पाणी पिणे. सूप मूगाचे कढण असा हलका आहार घेणे. हे लगेच आराम देते. सौफ लवंग चघळणे.

पोटावर शेक घेणे. हिंगाचा लेप लावणे. लिंबू रस सैंधव आलं याचे चाटण गॅसेस कमी करते. एरण्डतेल किंवा त्रिफळा सारखे औषध पोट साफ करुन उर्ध्व गेलेल्या वायुचे अनुलोमन करते. आलं जीरं घालून ताक घेणे या सर्व गोष्टी पाचन ठिक करण्याकरीता मदत करतात त्यामुळे विकृत ढेकर येण्याच्या त्रासावर लाभ मिळतो. वारंवार असे घडत असेल तर वैद्याच्या सल्ल्याने औषधोपचार नक्की करावा. जेणेकरून भविष्यात हा त्रास गंभीर व्याधीत रुपांतरीत होणार नाही.

शुद्ध ढेकर आरोग्याचे लक्षण आहे व उद्गार वेग अडविणे नक्कीच त्रासदायक ठरू शकते. परंतु उद्गार येतांना कुठला वास असणे हे पाचन बिघडल्याचे लक्षण हे समजणे गरजेचे!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER