शेख मुजीब-उर-रहमान यांच्या जीवनावरील ‘बंगबंधू’ सिनेमाला सुरुवात

Dadasaheb Phalke Chitranagari - Bangabandhu - Sheikh Mujibur Rahman

भारत (India) आणि बांगलादेश (Bangladesh) यांची संयुक्तपणे निर्मिती असलेल्या ‘बंगबंधू’ (Bangabandhu) या शेख मुजीबुर रहमान यांच्यावरील चरित्रपटाच्या चित्रीकरणाला गुरुवारपासून सुरुवात करण्यात आली. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने आखून दिलेल्या कोविड (COVID-19) विषयक नियमांचे पालन करत मुंबईतील दादासाहेब फाळके चित्रनगरी (Dadasaheb Phalke Chitranagari) येथे मुहूर्त चित्रीकरण करण्यात आले.

बांगलादेशच्या राष्ट्रपित्याच्या जन्मशताब्दी सोहळ्याचा एक भाग म्हणून या चित्रपटाची निर्मिती केली जात आहे. केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी गोव्यात 51 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी भारत आणि बांगलादेश यांच्यातील कला आणि संस्कृती क्षेत्रातील निकटच्या सहकार्याचे उदाहरण म्हणून या चित्रपटाचा उल्लेख केला होता. ज्येष्ठ दिग्दर्शक श्याम बेनेगल हे या चरित्रपटाचे दिग्दर्शन करीत आहेत. अतुल तिवारी आणि शमा जैदी यांनी सिनेमाची पटकथा लिहिली आहे, नितीश रॉय चित्रपटाचे कला दिग्दर्शक असून संगीत शंतनू मोईत्रा यांनी दिले आहे.

बांग्लादेशचा चित्रपट आणि दूरचित्रवाणी अभिनेता आरिफिन शुवू बंगबंधू शेख मुजीबुर रहमान (Sheikh Mujibur Rahman) यांची भूमिका साकारत असून नुसरत इमरोस तिशा ही शेख फाजिलतुन्नेसाची भूमिका साकारत आहे. नुसरत फरिया सध्या बांग्लादेशच्या पंतप्रधान असलेल्या शेख हसीनाची भूमिका साकारणार आहेत. तौकीर अहमद हे सोहरावर्दी यांच्या भूमिकेत दिसणार आहेत.

भारत आणि बांगलादेश दरम्यान दृकश्राव्य सहनिर्मिती कराराअंतर्गत या चित्रपटाची निर्मिती केली जात आहे. राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ (एनएफडीसी) आणि बांगलादेश चित्रपट विकास महामंडळ (बीएफडीसी) यांच्यात गेल्या वर्षी 14 जानेवारी रोजी या चित्रपटाच्या निर्मितीसाठी सामंजस्य करार झाला होता. या सिनेमाचे शूटिंग गेल्या वर्षी मार्चमध्ये सुरू होणार होते. पण कोरोनामुळे शूटिंग होऊ शकले नव्हते. आता सरकारने शूटिंगसाठी परवानगी दिल्यानंतर गुरुवारी सिनेमाचा मुहर्त करण्यात आला. यासाठी बांगलादेशमधील कलाकार भारतात आले होते. श्याम बेनेगल, यांच्यासह कलाकार आणि तंत्रज्ञ, मुंबईतील बांगलादेशचे उप-उच्चायुक्त मो. लुटफोर रेहमान आणि महाराष्ट्र चित्रपट, नाट्य आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक मनीषा वर्मा यावेळी विशेषत्वाने उपस्थित होत्या.

दादासाहेब फाळके चित्रनगरीत या सिनेमासाठी भव्य सेट लावण्यात आला असून येथे सुमारे 100 दिवस पहिल्या टप्प्याचे शूटिंग केले जाणार आहे. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील शूटिंग बांगलादेशात केले जाणार असून तेथे प्रामुख्याने मुक्तिवाहिनींच्या स्वातंत्र्यलढ्याचे चित्रण केले जाणार आहे. हा सिनेमा हिंदी आणि बांगला भाषेत तयार करण्यात येणार असून याच वर्षी भारत आणि बांगलादेशमध्ये रिलीज केला जाणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER