तरुणाईच्या सळसळत्या उत्साहाचंही बिगिन अगेन…

Steet Food in Pune

Shailendra Paranjapeपुणे महापालिका आयुक्तांनी हॉटेल्स रेस्टॉरन्ट्स पावभाजी स्टॉल्स (Hotels Restaurants Pavbhaji Stalls) यांना मध्यरात्रीनंतर एक वाजेपर्यंत व्यवसाय करण्याची परवानगी दिली आहे. सोमवारपासून पुण्यातली महाविद्यालयेही सुरू होत आहेत. त्यामुळे आता रात्री बारापर्यंत पावभाजी कॉफीचा आस्वाद घेणारी तरुणाई पुण्याच्या विविध भागातल्या हॉटेल्स स्टॉल्सवर दिसू लागणार आहे.

करोनामुळे मरगळलेल्या सुस्तावलेल्या शहरात आता काहीसा उत्साह संचारण्यास या निर्णयामुळे मदत होईल. नाटक आणि चित्रपट या दोन करमणूक या सदरात मोडणाऱ्या पण संपूर्णपणे वेगळं व्यावसायिक गणित असलेल्या प्रकारांविषयी मिशन बिगिन अगेन नंतरही प्रेक्षकांचा प्रतिसाद पूर्णपणे भिन्न असल्याचं दिसतंय. नाचकांना आता गर्दी उसळू लागली आहे. नाटकांबरोबरच संगीत मैफली, संगीत महोत्सव, नाट्यमहोत्सव अशा कार्यक्रमांना रसिकांचा चांगला प्रतिसा दिसून येतोय पण चित्रपटगृहांकडे मात्र रसिकांचे पाय वळताना दिसत नाहीयेत.

वास्तविक नाटकाचे तिकीट चित्रपटाच्या तिकिटापेक्षा तुलनेने कमी असते. तरीही चित्रपट गृहांमधे नवे चित्रपट रिलीज केले जात नाहीयेत. प्रेक्षक नाहीत म्हणून चित्रपट नाही आणि चित्रपट येत नाहीयेत म्हणून प्रेक्षक चित्रपटगृहांकडे येत नाहीयेत, ही कोंडी फुटण्याची गरज आहे. चित्रपट गृहात चित्रपट बघण्याची मज घरातल्या होम थिएटरवर किंवा टीव्हीच्या छोट्या पडद्यावर चित्रपट पाहण्यात नक्कीच नाही. पण तरीही चित्रपटांना लोक येत नाहीयेत, हे वास्तव आहे. या क्षेत्रातल्या धुरिणांनीच एकत्र बसून यावर काही तरी तोडगा काढण्याची गरज आहे. कारण अभिनेते निर्माते प्रशांत दामले यांनी यांच्या नाटकाचे प्रयोग आता पुण्यामुंबईबाहेर महाराष्ट्राच्या सर्व भागात सुरू करत असल्याचे जाहीर केलेय. त्यामुळे चित्रपटांच्या बद्दलही असाच प्रतिसाद मिळण्यासाठी शक्य ते सर्व केले जायला हवे. तरच मिशन बिगिन अगेन संपूर्णपणे यशस्वी होईल.
मिशन बिगिन अगेनमधे जीवनाच्या सर्वच क्षेत्रात नवप्रारंभाची नांदी व्हायला हवी आहे. त्यादृष्टीने बारामती तालुक्यातल्या प्रेरणा कमलाकर कांबळे यांनी मिळवलेल्या पीएचडीची बातमी प्रेरणादायी अशीच आहे. बारामतीमधे ११०० हून अधिक महिला बचत गटांच्या माध्यमातून ११ हजारहून अधिक महिलांना रोजगार मिळू शकलेला आहे. लोणची, जाम्स, पापड, मसाले, वेफर्स, भाजीपाला, दुग्धव्यवसाय, हॉटेल व्यवसाय, कापडी पिशव्या अशा विविध प्रकारचे व्यवसाय महिला स्वयंसहायता बचत गटाच्या माध्यमातून महिला करताहेत. त्याद्वारे आपल्या पायावर उभ्या रहातानाच कुटुंबालाही हातभार लावताहेत.

महिला बचत गटांची उत्पादने, त्यांची प्रदर्शने, त्यातून होणारी विक्री हे सारं आपण नेहमी बघत असतो. पण प्रेरणा कांबळे यांनी त्याचा शास्त्रशुद्ध अभ्यास करून महिला बचत गटातल्या सदस्यांची माहिती घेतलीय. त्याद्वारे या महिलांना आणखी कोणत्या प्रकारचे शिक्षण प्रसिक्षण घेण्याची गरज आहे ज्याद्वारे त्यांचे उत्पन्न वाढू शकेल, हा विचारही त्यांच्या संशोधनातून केलेला आहे, हे विशेष. पीएचडीचा प्रबंध करताना केवळ आपला अभ्यास व्हावा, यापेक्षाही या महिलांचे राहणीमान आणखी उन्नत कसे होईल, हा विचारही प्रेरणा कांबळे यांनी केलेला आहे, यासाठी त्यांचे अभिनंदनच करायला हवे.

मिशन बिगिन अगेनमधे महाविद्यालये सुरू होत असल्याने शहरात एक प्रकारचे उत्साहाचे वातावरण दिसून येईल. कारम तरुणाईच समाजात जिवंतपणा आणत असते. गेले जवळपास वर्षभर महाविद्यालये ओस पडून गेल्यामुळे आणि साऱ्याच अँक्टिव्हिटीज ऑनलाइन झाल्याने प्रत्यक्ष भेटी होत नव्हत्या. आता महाविद्यालये, चहाच्या टपऱ्या, कॉफी पिता पिता हे सारं सुरू होईल. त्यामुळे व्हँलेन्टाइन डेच्या पार्श्वभूमीवर पुणे

शहर आता सळसळत्या तरुणाईच्या उत्साहाने भारून जाईल आणि मग सुरू होतील साऱ्या महाविद्यालयीन उपक्रमांची सुरुवात आणि ती असेल नांदी शहर पूर्वपदाला येत असल्याची.
शैलेन्द्र परांजपे

Disclaimer: ‘संपादकीय’ लिहिणारे हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांचे स्वतंत्र मत आहे. त्यांच्या लेखासोबत ‘महाराष्ट्र टुडे’चा कसलाही संबंध नाही. आम्ही केवळ त्यांचे मत मांडण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून करत आहोत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER