बिगिन अगेन विथ सिंहगड…

Shailendra Paranjapeनववर्षाच्या सुरुवातीलाच राज्यातून करोना हद्दपार होत असल्याचे शुभवर्तमान येऊन धडकले होते. त्यापाठोपाठ आता पुण्यातल्या दुर्गप्रेमींसाठी चांगली बातमी आलीय. ती म्हणजे पुणे जिल्ह्यातली ऐतिहासिक स्थळं, किल्ले, संग्रहालये खुली होत आहेत. खरे तर जीवनाची सर्व क्षेत्रं मिशन बिगिन अगेन अंतर्गत खुली केली जात असताना आणि ऐन दसरा दिवाळीत करोना (Corona) पुण्याच्या गर्दीत चेंगरून मरण्याइतकी गर्दी होत असताना काही विशिष्ट क्षेत्रांमधले बिगिन अगेन अजूनही का सुरू नाही होत, हा यक्षप्रश्नच होता. त्यामुळे किल्ले, संग्रहालये आणि इतर पर्यंटन स्थळे खुली होणं म्हणजे वरातीमागून घोडं अशीच स्थिती आहे.

करोनामुळे आधी लॉकडाऊन आणि नंतर मिशन बिगिन अगेनमधे विविध क्षेत्रातले व्यवहार सुरळीतपणे सुरू झाले. केंद्र सरकारने घेतलेले निर्णय आणि त्या त्या राज्यातली स्थिती लक्षात घेऊन स्थानिक पातळीवर घेतले गेलेले निर्णय यातही तफावत होता. त्यामुळे नवी दिल्लीत चित्रपटगृहे आणि शाळा सुरू झाल्या तरी महाराष्ट्राली परिस्थिती लक्षात घेऊन त्यानंतर महिना दोन महिन्यांनी चित्रपटगृहे (Theaters) खुली केली गेली पण मुळात पब्लिक सिनेमा बघायलाच येत नसल्यामुळे चित्रपटगृहे सुरू होऊनही ती चालत नाहीयेत, अशी स्थिती आहे. त्याबरोबरच महाराष्ट्रातल्या सर्व एकपडदा चित्रपटगृहांची तर अवस्था आणखीन वाईट आहे. महाराष्ट्रात नाटकांचे प्रयोग सुरू झाले आहेत.

शाळा सुरू करायचा निर्णय राज्यातली परिस्थिती लक्षात घेऊन घेण्यात आलाय. देशाच्या तुलनेत महाराष्ट्रातली स्थिती विशेषतः मुंबई आणि पुण्यातली करोना स्थिती खूपच गंभीर होती. पुणे-मुंबईमधे रुग्णसंख्या तसंच करोना मृत्यूंचे प्रमाणही जास्ती होते. त्यामुळे महाराष्ट्रात शाळा सुरू करण्याबद्दल निर्णय घेणं तितकसं सोपं नव्हतं. त्यातून पालकांनी धोका पत्करून पाल्यांना शाळेत पाठवणं, हेही जोखमीचंच होतं.

शाळा महाविद्यालये या संदर्भात सरकारची म्हणून थेट जबाबदारी असते पण संग्रहालये, किल्ले अशा ठिकाणी स्वेच्छेने जाणाऱ्या लोकांवर निर्बंध आल्याने संग्रहालयतले नोकर, संग्रहालय चालक, तसेच त्या विषयातले तज्ज्ञ या सर्वांनाच करोनाचा फटका बसलेला आहे. त्यात संग्रहालयांना सरकारने इतर सर्वच कपातीप्रमाणे ३३ टक्के निधीवर कामकाज चालवायला सांगितल्याने त्यांनीही आता सुटकेचा निःश्वास टाकला आहे. मात्र, त्यांनाही चित्रपटगृहांप्रमाणेच संग्रहालयात लोक येतील का, मुळात पर्यंटन त्या प्रमाणात सुरू होईल का, हे प्रश्न आहेत आणि ते अनुत्तरितच आहेत.

त्या तुलनेत किल्ले खुले केल्याने दुर्गप्रेमींना मात्र निश्चितच दिलासा मिळणार आहे. एक तर पुण्यामधे विविध प्रकारचे अनोखे उपक्रम करणाऱ्यांची संख्या जशी लक्षणीय आहे तशीच दर रविवारी आणि गुरुवारीही ऐतिहासिक सिंहगड किल्ल्यावर जाणाऱ्यांची संख्याही लक्षणीय आहे. सिंहगडावर हे सारे लोक जातात, ते विविध कारणांपोटी. दुर्गप्रेमींसह केवळ तंदुरुस्तीसाठी आठवड्यातून एकदा सिंहगडावर जाणारे कमी नाहीत. त्याशिवाय रविवारी गुरुवारी सुटी असणारे, करोनामुळे घरात राहून गंजू लागलेले आणि मोकळा श्वास घेऊ इच्छिणारे असे सारे जण किल्ले खुले होत असल्याने खचितच आनंद व्यक्त करतील.

खरे तर सिंहगडला लोक याआधीच जाऊ लागलेत. पुणे जिल्ह्यात तोरणा, राजगड, पुरंदर, शिवनेरी, रायरेश्वर हेही किल्ले आहेत. त्यामुळे पुणे जिल्ह्यात पुणे शहरातून एक दिवसाच्या आणि दोन दिवसांच्या सहली करता येतील, साहसी पर्यंटन करता येईल, असे शंभरच्या आसपास स्पॉट्स आहेत. त्यामुळे ऐतिहासिक स्थळे, किल्ले संग्रहालये खुली करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयामुळे साहसी पर्यटन करणारे, गडकिल्ल्यांवर जाऊ इच्छिणारे हे सारे नक्कीच खूष होणार आहेत. त्यामुळे दुर्गप्रेमी नसाल तरीही नववर्षाचा संकल्प म्हणून आठवड्यातून एकदा सिंहगडला जा आणि तंदुरुस्त राहा. करोनोत्तर काळातले तंदुरुस्तीचे मिशन बिगिन सुरू करा.

शैलेन्द्र परांजपे

Disclaimer:-‘संपादकीय’ लिहिणारे हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांचे स्वतंत्र मत आहे. त्यांच्या लेखासोबत ‘महाराष्ट्र टुडे’चा कसलाही संबंध नाही. आम्ही केवळ त्यांचे मत मांडण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून करत आहोत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER