मंत्री होण्याआधीच अजित पवारांचा बैठकींचा धडाका

Ajit Pawar

पुणे :- जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनीच राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार अजित पवार यांना बैठक घेण्याचे अधिकार दिले आहेत. त्यामुळे पालकमंत्री  होण्याआधीच अजित पवारांनी प्रशासकीय बैठकांचा धडाका सुरू केला आहे. अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात कालवा समिती बैठक झाली.

जलसंपदा विभागाचा कारभार हा दुसऱ्या मंत्र्याकडे आहे आणि त्यांनी अजित पवारांना मंत्री नसताना अधिकार कसे दिले? असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी विचारला आहे. अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली होत असलेल्या कालवा समितीच्या बैठकीला चंद्रकांत पाटील, गिरीश बापटही हजर आहेत. त्यामुळे आगामी काळात या मुद्द्यावरून पुन्हा एकदा सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने येण्याची शक्यता आहे.

‘पुण्याच्या पाणी वाटपावर आजच्या बैठकीत निर्णय अपेक्षित आहे. पुणे शहराला दर गुरुवारी पाणी पुरवठा बंद केला जातो. महापालिका देखभाल दुरुस्तीसाठी पाणी पुरवठा बंद केल्याचे सांगत आहे. त्यामुळे यावर तोडगा काढणे गरजेचे आहे. तसेच सांडपाण्यावर पुनर्प्रक्रिया करून ते शेतीला दिले पाहिजे. ’ अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. ही बैठक नियमबाह्य आहे किंवा यात घेतलेले निर्णय रद्द होऊ शकतात असे मी म्हणणार नाही. मात्र तुमच्यासारखे कोणी कोर्टात गेल्यावर निर्णय रद्द होऊ शकतात, अशी शक्यता चंद्रकांत पाटील यांनी वर्तवली आहे.

जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी कालवा सल्लागार समितीतून चार सदस्यांना वगळण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतर भाजप आणि राष्ट्रवादीत आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडण्यात येत आहेत. भाजप खासदार रणजितसिंह निंबाळकर आणि आमदार जयकुमार गोरे यांनी याबाबत जयंत पाटील यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्यावर चंद्रकांत पाटील यांनी भाष्य केले आहे. जयकुमार गोरे किंवा इतरांना कालवा समितीतून का काढले हे मला पाहावे लागेल.  अर्धवट माहितीवर मी बोलणार नाही, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.