
बीड जिल्ह्यातील परळी बैजनाथ येथील एक 22 वर्षीय तरूणी पूजा चव्हाण हिच्या कथित आत्महत्या (Pooja Chavan suicide case) प्रकरणाच्या अनुषंगाने विविध माध्यमांमध्ये तसेच समाजमाध्यमांवर विविध प्रकारच्या चर्चा होत आहेत. त्यासंदर्भात काही ऑडिओ क्लिप्स सुद्धा सर्वत्र फिरत आहेत. या प्रकरणावरून बंजारा समाजात प्रचंड अस्वस्थतेचे वातावरण आहे. या प्रकरणात सर्वंकष आणि सखोल चौकशी करण्याची मागणी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पोलिस महासंचालकांकडे पत्रातून केली आहे.
पोलिस महासंचालकांना पाठविलेल्या पत्रात देवेंद्र फडणवीस म्हणतात की, स्व. पूजा चव्हाणच्या कथित आत्महत्याप्रकरणातील काही ऑडिओ क्लिप्स सुद्धा समाजमाध्यमांमध्ये व्हायरल होत आहेत. अशा एकूण 12 ऑडिओ क्लिप्स माझ्या कार्यालयास प्राप्त झाल्या आहेत. आपल्या अवलोकनार्थ त्या ऑडिओ क्लिप्सची प्रत या पत्रासोबत जोडत आहे. या ऑडिओ क्लिप्समध्ये बोलणारे कोण आहेत, त्यांच्या संवादाचा नेमका अर्थ काय, त्यातून स्व. पूजा चव्हाणची खरोखर आत्महत्या आहे की तिला आत्महत्येस प्रवृत्त करण्यात आले, असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहेत. एकूणच तिच्या मृत्यूबाबत संशयाचे वातावरण यामुळे निर्माण होत आहे. सध्याचा तपास हा वरकरणी होत असल्याचे खेदाने नमूद करावेसे वाटते. ही आत्महत्या किंवा आत्महत्येमागील घटनाक्रम संशयास्पद असल्याचा आरोप त्यामुळे बंजारा समाजातून मोठ्या प्रमाणात होतो आहे. त्यामुळे या सर्व ऑडिओ क्लिप्सची सखोल आणि सर्वंकष चौकशी होणे नितांत गरजेचे आहे. ही चौकशी तत्काळ करून बंजारा समाजात अतिशय लोकप्रिय असलेल्या या तरुणीला तत्काळ न्याय द्यावा आणि दोषींवर कठोर कारवाई करावी.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला