राष्ट्रवादीचे लक्ष्य बीड! गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाला बळकटी मिळणार- धनंजय मुंडे

NCP

पुणे :- राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या अध्यक्षतेखाली आज ऊसतोड कामगारांच्या प्रश्नांवर पुण्यात बैठक पार पडली. यावेळी गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या माध्यमातून ऊसतोड कामगारांची नोंदणी करून विविध योजना राबवण्याबरोबरच महामंडळाचे लवकरच बळकटीकरण करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी दिली.

राज्यातील ऊसतोडणी व वाहतूक कामगारांच्या संघटनांकडून आज २७ ऑक्टोबर रोजी विविध मागण्या आणि प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी (बुद्रुक) येथे बैठक आयोजित करण्यात आली होती.

राज्यातील ऊसतोडणी कामगारांचे अनेक प्रलंबित असलेले प्रश्न महामंडळाच्या माध्यमातून कशा पद्धतीने मार्गी लावता येतील यासंदर्भात सविस्तर सादरीकरण सामाजिक न्याय विभागाच्यावतीने करण्यात आले.

ऊसतोड कामगारांच्या सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक विकासासाठी महामंडळाच्यावतीने करण्यात येणाऱ्या उपाययोजना तसेच महामंडळाला स्वायत्त व सक्षम बनवण्यासाठी करण्यात येणारी नियमावली याबाबतची सविस्तर माहिती यावेळी समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी दिली.

महामंडळाचे प्रादेशिक स्तरावर कार्यालय, कंपनी कायद्या अंतर्गत नियमावली बनवणे, ऊसतोड कामगार, पशु, वाहने आदींची नोंदणी करून ओळखपत्र देणे, नवीन पदांना मंजुरी देणे, साखर कारखाने तसेच ऊसतोड कामगारांसाठी नवीन योजना, वैयक्तिक अर्थ साहाय्य योजना, ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी वसतिगृहे, भोजन योजना, ऊसतोड कामगार महिलांसाठी आरोग्याच्या विविध योजना, त्याचप्रमाणे ऊसतोड कामगार यांच्यासाठी विमा योजना, यासह विविध बाबींवर यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली.

शरद पवार यांनी सामाजिक न्याय विभागाच्यावतीने महामंडळाच्या माध्यमातून ऊसतोड कामगारांचा प्रश्न सोडविण्यास मदत होणार असल्याचा आशावाद पवारांनी व्यक्त केला. महामंडळाला देण्यात येणाऱ्या बळकटीबाबत सामाजिक न्याय विभागाच्या कार्याबद्दल पवारांनी समाधान व्यक्त केले. तसेच महामंडळाच्या माध्यमातून ऊसतोड कामगारांचे जास्तीत जास्त प्रश्न, समस्या सोडवण्यासाठी नोव्हेंबरअखेर महामंडळाची नोंदणी करून डिसेंबरपासून महामंडळाचे कामकाज पूर्ण क्षमतेने सुरू करण्याचे निर्देश शरद पवार यांनी यावेळी दिले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER