बीड लोकसभा : बीडचे राजकारण पुन्हा एकदा मुंडेंभोवतीच

beed loksabha elections 2019

पंचवीस वर्षांहून अधिक काळ बीडचे राजकारण गोपीनाथ मुंडे हवेत की नकोत या एका गोष्टीभोवती फिरत आले आहे.मुंडे यांच्या निधनाला आता पाच वर्षे होत आली पण तरीही राजकारण मुंडेंभोवतीच फिरत आहे. आगामी निवडणुकीत ते प्रीतम गोपीनाथ मुंडे यांच्याभोवती फिरेल. अर्थात त्यात पंकजा मुंडे,धनंजय मुंडे असतीलच. भाजपाला बहुजन चेहरा मिळवून देणारा नेता ही गोपीनाथजींची अमीट ओळख. प्रमोद महाजन यांच्या साथीने त्यांनी भाजपाच्या वाढीसाठी अहोरात्र मेहनत घेतली. 2014 मध्ये ते जवळपास सव्वा लाख मतांच्या आधिक्याने लोकसभेवर दुसऱ्यांदा निवडून गेले. केंद्रात मंत्री झाले.दीर्घकाळाच्या संघर्षानंतर मिळालेले हे यश नियतीने हिरावून घेतले. मुंडे यांचे अकाली निधन झाले. त्यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांच्या कन्या प्रीतम यांनी 6 लाख 96 हजार 321 मतांनी विक्रमी विजय मिळविला. त्याच प्रीतम यावेळी भाजपच्या उमेदवार असतील. घोषणेची औपचारिकता तेवढी बाकी आहे. प्रीतम यांच्या उमेदवारीच्या निमित्ताने त्यांच्या ज्येष्ठ भगिनी आणि राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. गोपीनाथ मुंडे हयात असताना 2009 च्या विधानसभा निवडणुकीत बीड मतदारसंघातील सहा विधानसभा जागांपैकी केवळ एक परळीची जागा पंकजा मुंडे यांनी जिंकली होती. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत मुंडे हयात नसताना सहापैकी पाच भाजपा आमदार निवडून आले.सध्या केवळ बीड शहराची जागा राष्ट्रवादीकडे असून माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर तेथील आमदार आहेत. उर्वरित परळी -पंकजा मुंडे, गेवराई -लक्ष्मण पवार, माजलगाव -आर.टी. देशमुख, केज -संगीता ठोंबरे आणि आष्टी -भीमराव धोंडे हे पाचही भाजपाचे आमदार आहेत.

ही बातमी पण वाचा : पंकजा मुंडे धनंजय मुंडेंवर हल्ला चढवताना म्हणाल्या, ‘अरे किती दिवस पवारांची चमचेगिरी करणार’

अर्थात वडील गोपीनाथ मुंडे यांचा करिष्मा आजही कायम आहे. जिल्ह्यातील राजकीय परिस्थिती भाजपाला अनुकूल आहे. म्हणूनच प्रीतम यांना गेल्यावेळइतके मताधिक्य ( जरी ) मिळणार नाही पण ( तरी ) विजय त्यांना निश्चितच हुलकावणी देणार नाही.त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसने तुलनेने दुबळा उमेदवार दिला आहे. राष्ट्रवादीकडून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि पंकजा मुंडे यांचे हाडवैरी धनंजय मुंडे यांच्या पत्नी किंवा माजी आमदार अमरसिंह पंडित वा माजी मंत्री प्रकाश सोळंके यांची नावे चर्चेत होती. या तिघांपैकी कोणालाही उमेदवारी मिळाली असती तर प्रीतम यांच्यासमोर मोठे आव्हान उभे करता आले असते. मात्र, राष्ट्रवादीने ती संधी गमावली.

हि बातमी पण वाचा : जालना लोकसभा : अडथळे दूर तरी दानवेंची जालनामध्ये परीक्षाच

संपूर्ण राज्यभर भाजपाच्या विरोधात आरोपांची राळ उठवित असलेले धनंजय यांच्यासमोर बीडची जागा राष्ट्रवादीकडे खेचून आणण्याचे मोठे आव्हान आहे. बीडची जनता पंकजा यांच्याबरोबर आहे की धनंजय यांच्यासोबत याचा फैसला करणारी ही निवडणूक असेल. या मतदारसंघात जवळपास 35 टक्के मतदान हे मराठा समाजाचे असून त्याखालोखाल 32 टक्के मतदार मुंडे यांच्या वंजारी समाजाचे आहेत. वंजारी मते मुंडेंना नेहमीच साथ देतात. मराठा मतांचे मात्र विभाजन होते असा आजवरचा अनुभव आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग सोनवणे हे मराठा समाजाचे आहेत. एकेकाळी तेदेखील गोपीनाथ मुंडे यांचे कट्टर समर्थक होते.आज ते धनंजय मुंडे यांचे कट्टर समर्थक मानले जातात. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित आघाडीने निवृत्त प्राध्यापक विष्णू जाधव यांना उमेदवारी दिली असली तरी ते फारशी मते घेतील ह्याची शक्यता नाही.

हि बातमी पण वाचा : गोपीनाथ मुंडे यांचं स्वप्न आमच्या बहिणीला कळत नाही हीच खंत -धनंजय मुंडे

शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचे जिल्ह्यात काहीसे प्रस्थ आहे. त्यांचे तीन जिल्हा परिषद सदस्य असून ते भाजपा सोबत आहेत.जिल्हा परिषदेत भाजपाची सत्ता आहे मात्र पंकजा मुंडे यांच्याशी त्यांचे वाद सध्या विकोपाला गेले आहेत. आपण राज्यभर भाजपाच्या उमेदवारांचा प्रचार करू पण बीडमध्ये करणार नाही अशी घोषणा त्यांनी केली आहे. मेटे नेहमीच त्यांची राजकीय निष्ठा बदलत आले आहेत. त्यांचे उपद्रव मूल्यदेखील मोठे आहे. जिल्ह्यातील एक बडे नेते माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर हे शरीराने राष्ट्रवादीमध्ये तर मनाने भाजपात आहेत. त्यांच्या आई केशरकाकू क्षीरसागर बीडच्या तीन वेळा खासदार होत्या.मुंडे भगिनींना जयदत्तअण्णांचा आशीर्वाद आहे. नजीकच्या काळात ते भाजपातदेखील जाऊ शकतात. एकेकाळी गोपीनाथ मुंडे यांचे कट्टर समर्थक असलेले पण नंतर राष्ट्रवादीमध्ये गेलेले माजी राज्यमंत्री सुरेश धस अलीकडे भाजपात परतले आणि स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेवर निवडून गेले. तेही मुंडे भगिनींसोबत आहेत.पत्नीला रिंगणात उतरण्याची राजकीय हिंमत धनंजय मुंडे यांनी दाखविली नाही. धनंजय यांचे राष्ट्रवादीतील वाढते महत्व जिल्ह्यातील पक्षाच्या इतर नेत्यांना सलते. आपल्या पत्नीला उमेदवारी दिली तर इतर सगळे मिळून आपली कोंडी करतील अशी भीती वाटल्याने की काय धनंजय मुंडे बॅकफूटवर गेले असे मानले जाते.

समीकरणे :

बीड लोकसभा मतदारसंघात मुस्लिम, बौद्ध, ओबीसी आणि मराठा या समाजाचे प्राबल्य असून ओबीसीत वंजारी, माळी, लिंगायत या जाती प्रभावशाली आहेत. अनुसूचीत जाती – जमातीतिल नवबौद्ध, चर्मकार , मातंग यांची लोकसंख्या पण संख्यात्मक दृष्टीने प्रभावी आहे. खुल्या प्रवर्गातील मतदार ३३ %, अनुसूचित जमाती ०१ %, इतर मागास वर्गातील ३० % , अनुसूचित जातींचे १३ % तर इतर २३ % मतदार आहेत.