कर्नाटक आणि केरळमधील दोघांना चोरीच्या मोबाईलसह बेड्या

- रॅकेटचा पर्दाफाश

मुंबई : चोरीचे मोबाईल्सचे आयएमईआय नंबर बदली करुन विक्रीसाठी घेऊन जात असलेल्या कर्नाटक आणि केरळमधील दोघांना गुन्हेशाखेच्या कक्ष सहाने बेड्या ठोकल्या आहेत. मन्सूर सुलेमान (30) आणि इब्राहीम मोईद्दीन (25) अशी या आरोपींची नावे असून पोलिसांनी त्यांच्याजवळून चोरीचे 58 मोबाईल्स जप्त केले आहेत.

चोरी केलेल्या मोबाईल्सचे आयएमईआय नंबर बदली करुन त्यांच्या विक्रीची एक मोठी डील मानखुर्दमध्ये होणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या कक्ष सहाचे सपोनि महेश तोरस्कर यांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे कक्षाचे प्रमुख पोनि दिपक चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रकांत दळवी, सपोनि तोरस्कर, महेंद्र घाग आणि अनिल गायकवाड यांच्यासह अधिकारी आणि अंमलदारांच्या पथकाने मानखुर्द गाव रिक्षा थांब्याजवळ सापळा रचला.

खबर्‍याकडून मिळालेल्या माहितीनुसार दोन संशयीत तेथे पोहचताच गुन्हे शाखेने दोघांनाही ताब्यात घेतले. सुलेमान हा कर्नाटकातील पुत्तूरचा आणि मोईद्दीन हा केरळमधील मंजेश्वर येथील रहिवाशी आहे. दोघांचीही गावच्या ठिकाणी मोबाईल विक्रीची दुकाने आहेत. त्यामूळे दोघेही पोलिसांना उलटसुलट उत्तरे देऊ लागले. अखेर पोलिसांनी त्यांच्याजवळील 5 लाख 80 हजार रुपये किंमतीचे 58 मोबाईल आपल्या ताब्यात घेत त्यांची तपासणी केली. यातील बहुतांश मोबाईल्सचे आयएमईआय नंबर सारखेच असल्याचे स्पष्ट झाल्याने दोन्ही आरोपी खोटे बोलत असल्याचे स्पष्ट झाले.

गुन्हेशाखेने अखेर मानखुर्द पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन दोन्ही आरोपींना अटक करुन चौकशी सुरु केली. त्यात हे मोबाईल चोरीचे असून आयएमईआय नंबर बदली करुन कर्नाटक आणि केरळमध्ये विक्रीसाठी नेत असल्याची कबुली या दोन्ही आरोपींनी दिली. न्यायालयाने या दोन्ही आरोपींना 10 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून मोबाईल चोरी करुन विक्री करणार्‍या या रॅकेटमधील अन्य साथिदारांचा शोध सुरु असल्याचे गुन्हेशाखेने सांगितले.