माझ्या सैनिकामुळेच शिवसेना सत्तेत होती, आहे, आणि पुढेही राहणार – उद्धव ठाकरे

मुंबई : “हे सगळे तुम्ही माझे साथी सोबती आहात, हे असे सैनिक मिळायला सुद्धा भाग्य लागतं. केवळ मी माँ आणि बाळासाहेबांचा पुत्र आहे म्हणून हे भाग्य मला लाभलं आहे.” तुमच्यासारखे शिवसैनिक असल्यामुळेच “मी सत्तेत होतो, सत्तेत आहे आणि उद्याही शिवसेना सत्तेत राहणार” असा विश्वास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. दसऱ्याच्या शुभमहोत्सवर आयोजित दसरा मेळाव्यात ते बोलत होते.

यावेळी तमाम शिवसैनिकांना संबोधित करतांना उद्धव ठाकरे म्हणाले की, अत्यंत प्रामाणिकपणाने युतीचं काम करायचं आणि विधानसभेवर आपल्या युतीचा भगवा फडकवायचा, हा भगवा आपल्या शिवरायांचा भगवा आहे. मला युवकांना सांगायचं आहे की तुम्ही आता पुढे या, आज पर्यंत इतिहास हा युवकांनीच घडवला आहे आणि हा इतिहास पुन्हा घडवायचा आहे. मी तमाम महाराष्ट्रातल्या सैनिकांना जिथे जिथे त्यांच्या जागा सुटल्या असतील त्यांची मी माफी मागतो, पण एक लक्षात घ्या तुमची ताकद कधीही कुठेही कमी होता कामा नये. असे म्हणत त्यांनी उमेदवारी न मिळालेल्या शिवसैनिकांची जाहीर माफीही मागितली.

असं म्हणतात की वादळ असलं की सगळा पालापाचोळा उडून जातो, मला वादळामध्ये हे भगव वादळ काय असतं हे दाखवून द्यायचं आहे. शिवसेना-भाजपची युती प्रामाणिक आहे. कुणालाही वाटलं असेल तर शिवसेना युतीसाठी झुकली का? मात्र तसं मुळीच नाही, चंद्रकांत पाटील यांनी विनंती केली. आमची अडचण समजून घ्या. आम्ही वचन पाळणारी माणसं आहोत त्यामुळे आम्ही वचन पाळलं असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.

भाजपाला पाठिंबा नाही द्यायचा नाही तर मग कुणाला पाठिंबा द्यायचा? कलम 370 काढू नका म्हणणाऱ्या काँग्रेसला पाठिंबा द्यायचा का? शरद पवार आणि इतर मंडळींचं टार्गेट जोपर्यंत आपण आहोत तोपर्यंत आपलं टार्गेट तेच लोक राहणार. शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांचा कोथळा काढू हे विसरु नका असंही उद्धव ठाकरेंनी ठणकावून सांगितलं. भाजपा आणि शिवसेनेची युती महाराष्ट्राने स्वीकारली आहे. जागावाटपावर जे टीका करत आहेत त्यांना माझं हे उत्तर आहे असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.

मराठा समाजाला आरक्षण मिळाले तसेच धनगर समाजालाही मिळवून देणार. या देशाचे मुसलमान जरी आमच्यासोबत आले तरी आम्ही त्यांना न्याय-हक्क मिळवून देऊ, असे सांगत पहिल्यांदाच मुस्लिमांना चुचकारले. राम मंदिराच्या मुद्द्यावर जाहीरपणे काही बोलू नये, असे पंतप्रधान मोदी यांनी सुचवले आहे, हरकत नाही. सुप्रीम कोर्ट लवकरच न्याय देईल, अशी अपेक्षा आहे. अन्यथा संसदेने कायदा करून अयोध्येत राम मंदिर व्हावे, या मागणीचा ठाकरे यांनी पुनरुच्चार केला. भाजपशी शिवसेना झुकली या आरोपांचा त्यांनी इन्कार केला. शिवसेना फक्त शिवसैनिकांसमोर आणि मराठी मातीसमोरच झुकते, असे ते म्हणाले.