माजी नौसैनिकाला मारहाण : हल्लेखोर शिवसैनिकांना शिक्षा होईपर्यंत स्वस्थ बसणार नाही

Navneet Rana & Uddhav Thackeray

अमरावती : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे व्यंग्यचित्र ‘फॉरवर्ड’ करणाऱ्या माजी नौदल अधिकाऱ्याला शिवसैनिकांनी केलेल्या मारहाणीबाबत अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी संताप व्यक्त करून म्हटले की, हल्लेखोर शिवसैनिकांना शिक्षा होईपर्यंत स्वस्थ बसणार नाही.

आज उद्धव ठाकरे यांनी जनतेला संबोधित केले. कोरोनावर आणि विविध विषयांवर त्यांनी भाष्य केले; पण शिवसैनिकांकडून नौदलाचे माजी सैनिक मदन शर्मांवर झालेल्या हल्ल्याबाबत त्यांनी बोलणे टाळले. मुख्यमंत्री महाराष्ट्रातील जनतेला दिशा दाखवतील व काही दिलासा देतील या अपेक्षेने जनता डोळे लावून बसली होती. पण जनतेचा भ्रमनिरास झाला. हा संवाद नव्हता तर केवळ शब्दांचा खेळ करण्याचा केविलवाणा प्रयत्न होता, अशी टीका राणा यांनी केली.

निर्लज्ज समर्थन

त्या म्हणाल्या – गुंड प्रवृत्तीच्या शिवसैनिकांनी मदन शर्मा यांच्यावर भ्याड हल्ला केला. त्यांना रक्तबंबाळ करून बेदम मारहाण केली. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी या हल्ल्याचे निर्लज्जपणे समर्थन केले. हा केवळ एका माजी सैनिकावरील हल्ला नव्हता तर देशासाठी प्राणाची बाजी लावणाऱ्या, घरदारापासून दूर राहून देशसेवा करणाऱ्या व प्रामाणिकपणे कर्तव्य बजावून देशवासीयांची सेवा करणाऱ्या संपूर्ण देशातील माजी सैनिकांचा हा अपमान होता. माजी सैनिकांचे मनोबल खच्ची करण्याचा हा प्रयत्न होता.

देशातील कुठल्याही माजी सैनिकांचा अपमान खपवून घेणार नाही. या हल्लेखोरांना कठोर शिक्षा व्हायला पाहिजे. त्यांना दोन तासांत जामीन कसा मिळाला? त्यांना सोडणे ही सैनिकांची थट्टा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा  आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना भेटून या प्रकरणाची माहिती देईन; कठोर कारवाईसाठी आग्रही भूमिका घेईन, असे नवनीत राणा म्हणाल्या. महाराष्ट्रात अराजकता माजली आहे. महाराष्ट्रवासीयांनी या अन्यायाविरुद्ध एक व्हावे, असे आवाहन राणा यांनी केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER